चाळीसगावच्या मृत उद्योगपतीच्या वारसांना एसटी महामंडळाकडून ३८ लाखांची नुकसानभरपाई..
आयकर विवरणपत्र ठरले कुटुंबासाठी आर्थिक आधार!
जळगाव : एखाद्या व्यक्तीच्या अपघाती मृत्यूनंतर तिच्या कुटुंबाला मिळणारी नुकसानभरपाई निश्चित करताना मृत व्यक्तीचे उत्पन्न हा महत्त्वाचा निकष ठरतो. याचाच प्रत्यय चाळीसगाव येथील एका मोटार अपघाताच्या दाव्यात आला आहे. मृत उद्योगपती सदानंद मधुकर चौधरी यांनी नियमितपणे भरलेले आयकर विवरणपत्र त्यांच्या उत्पन्नाचा महत्त्वपूर्ण पुरावा ठरले. या पुराव्याच्या आधारे मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने त्यांच्या वारसांना ३८ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश एसटी महामंडळाला दिले आहेत.
एसटी बसच्या धडकेत झाला होता मृत्यू
सदानंद मधुकर चौधरी (रा. चाळीसगाव, जि. जळगाव) यांचा २१ डिसेंबर २०२४ रोजी चाळीसगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघात झाला होता. ते एमएच-१९-डीई-०६५५ क्रमांकाच्या मोपेड स्कूटीने धुळे रोडवरून चाळीसगाव येथील घरी जात असताना मागून येणाऱ्या शहादा ते छत्रपती संभाजीनगर मार्गावरील एसटी बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या चौधरी यांच्यावर चाळीसगाव व त्यानंतर धुळे येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान २४ डिसेंबर २०२४ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.या प्रकरणी एसटी बसचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २८१, १२५ (अ), (ब) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पत्नी, मुलगी, मुलगा आणि आईने दाखल केला दावा
सदानंद चौधरी यांच्या निधनानंतर पत्नी मनीषा चौधरी, मुलगी निकिता चौधरी, मुलगा भावेश चौधरी आणि त्यांच्या आई यांनी मोटार अपघात दावा न्यायाधिकरण, जळगाव येथे नुकसानभरपाईसाठी दावा दाखल केला. एसटी बसचालक रामदास दगडू खैरनार आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संबंधित आगारप्रमुखांना या दाव्यात प्रतिवादी करण्यात आले होते.
हॉटेल व्यवसाय आणि शेतीचे उत्पन्न आयकर विवरणपत्रातून स्पष्ट
मृत सदानंद चौधरी हे उच्चशिक्षित असून चाळीसगाव परिसरात प्रसिद्ध उद्योजक म्हणून परिचित होते. ते हॉटेल, बिअर बार, परमिट रूम आणि लिकर सेलचा व्यवसाय करीत होते. त्यांच्या मालकीचे ‘सदानंद हॉटेल, बिअर बार व लॉजिंग’ हे आस्थापन होते. यासोबतच ते प्रगतशील शेतकरी म्हणूनही ओळखले जात होते.या व्यवसायांमधून आणि शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा तपशील त्यांच्या आयकर विवरणपत्रात नमूद होता. नियमितपणे आयकर भरल्यामुळे त्यांच्या प्रत्यक्ष उत्पन्नाचा अधिकृत पुरावा न्यायालयासमोर सादर करता आला. अर्जदारांच्या वतीने ॲड. महेंद्र सोमा चौधरी यांनी सर्वोच्च न्यायालयाने निर्धारित केलेल्या नुकसानभरपाईच्या सूत्रानुसार आयकर विवरणपत्रातील उत्पन्न विचारात घेण्याची मागणी केली.
एसटी महामंडळाच्या वतीने मृत व्यक्तीचाच निष्काळजीपणा होता, असा युक्तिवाद करण्यासाठी बसचालकाची साक्ष नोंदविण्यात आली. मात्र, अर्जदारांचे वकील ॲड. महेंद्र चौधरी यांनी उलटतपासणीदरम्यान बसचालकाच्या जबाबातील बाबींची शहानिशा करून त्याचा निष्काळजीपणा न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. तसेच न्यायाधीशांनी घटनास्थळाची ऑनलाइन पाहणीही केली.या सर्व पुराव्यांचा आणि मृत व्यक्तीच्या आयकर विवरणपत्रातील उत्पन्नाचा विचार करून न्यायाधिकरणाने वारसांना ३८ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.
अवघ्या १ वर्ष ४ महिन्यांत निकाल
या दाव्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अपघातानंतर अवघ्या १ वर्ष, ४ महिने आणि ८ दिवसांत न्यायालयाने प्रकरणाचा निकाल दिला. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाचे सदस्य माननीय आर. एन. जोशी यांनी खुल्या न्यायालयात हा आदेश जाहीर केला.
या दाव्यात अर्जदारांच्या वतीने ॲड. महेंद्र सोमा चौधरी, ॲड. श्रेयस महेंद्र चौधरी, ॲड. हेमंत जाधव आणि ॲड. सुनील चव्हाण यांनी कामकाज पाहिले. दाव्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी चाळीसगावचे आमदार मंगेशदादा चव्हाण आणि समाजसेवक दिलीप रामराव चौधरी यांचे सहकार्य लाभले.
या निकालातून नियमित आयकर विवरणपत्र भरण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. अपघाती मृत्यूनंतर कुटुंबाला मिळणाऱ्या नुकसानभरपाईच्या निर्धारणात अधिकृत उत्पन्नाचा पुरावा महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, हे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे.