जळगावात आढळला पहिला कोरोनाचा रुग्ण, आरोग्य यंत्रणा सतर्क
जळगाव (प्रतिनिधी) – देशासह राज्यात कोरोनाच्या जे.एन. वन या सब व्हेरियंटमुळे खळबळ उडाली असून महाराष्ट्रात या व्हेरियंटचे अनेक रुग्ण आढळून आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. सदर रुग्ण हा भुसावळ तालुक्यातील कुर्हे पानाचे येथील रहिवाशी असून नुकताच तो नेपाळ वरून आल्याची माहिती देखील समोर आली आहे. नेमका हा कोरोनाचा jn1 व्हेरीअंट असल्याची डॉक्टरांची शक्यता वर्तवली असून त्याचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणी साठी पाठविण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून या रुग्णाला ताप, कफ आणि श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांच्या उपचार सुरू होते. मात्र राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला सतर्कतेचे आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या निर्देशावरून कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या रुग्णांच्या तपासणी जिल्ह्यात करण्यात येत असून त्यात हा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची प्रकृती ठीक…..
या रुग्णावर उपचार सुरू असून घरीच या रुग्णाला क्वारंटाईन केले आहे. या रुग्णाच्या संपर्कातील १४ जणांची तपासणी केली असून सर्व अहवाल निगेटीव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाचे म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची प्रकृती ठीक असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.