जळगाव

ग्रामसभेत ग्रामसेवकावर हल्ला : मारहाणीनंतर जीव वाचवताना ग्रामसेवकाचा मृत्यू..

पारोळा : तालुक्यातील शिवरे येथे ग्रामसभेदरम्यान शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या ग्रामसेवकावर झालेल्या मारहाणीच्या घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी पारोळा पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत सात जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०५ अन्वये गुन्हा दाखल केला असून, एका मुख्य आरोपीस अटक केली आहे.

शिवरे येथे १७ ऑगस्ट २०२६ रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ग्रामसेवक प्रल्हाद पाटील (वय ५२) हे शासकीय कर्तव्य बजावत होते. जुन्या बिलांच्या कारणावरून काही ग्रामस्थांनी त्यांच्याशी हुज्जत घालत वाद घातला. वाद वाढत जाऊन त्याचे रूपांतर मारहाणीत झाले. यावेळी सात जणांनी पाटील यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप आहे.मारहाणीनंतर जीव वाचवण्यासाठी पाटील हे घटनास्थळावरून पळून जात असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पारोळा पोलिसांनी विलंब न करता तातडीने तपास सुरू केला.

या प्रकरणी सात आरोपींविरुद्ध BNS कलम १०५ (सदोष मनुष्यवध) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हा नोंद क्रमांक ३१५/२०२६ आहे. तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी एका मुख्य आरोपीला तत्काळ अटक केली आहे. उर्वरित आरोपींच्या भूमिकेबाबत तपास सुरू आहे.

दरम्यान, मृत ग्रामसेवक प्रल्हाद पाटील यांच्या पार्थिवावर आज, १८ ऑगस्ट २०२६ रोजी बोधर्दे (ता. पारोळा) या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. घटनेच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ग्रामसभेसारख्या लोकशाही प्रक्रियेत शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यावर झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, या प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे