भालगाव येथे ‘निसर्ग मित्र’तर्फे अभिनव पद्धतीने ‘पाडवा पहाट’ साजरी..
पक्षी हेच शेतकऱ्यांचे खरे मित्र..
भालगाव, ता. एरंडोल – दिवाळी पाडव्याच्या पहाटे निसर्ग संवर्धनाचा अनोखा संदेश देत ‘निसर्ग मित्र, जळगाव’ यांच्या वतीने भालगाव येथे अभिनव पद्धतीने ‘पाडवा पहाट’ साजरी करण्यात आली. यानिमित्त गावातील चौकात ‘पक्षी – शेतकऱ्यांचे खरे मित्र’ या विषयावर आधारित जनजागृतीपर पोस्टर व छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला ग्रामस्थ आणि शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पक्षीमित्र शिल्पा गाडगीळ यांनी पक्षी सप्ताह साजरा करण्यामागील उद्देश आणि त्याचे पर्यावरणीय महत्त्व विशद केले. त्यानंतर पक्षीमित्र राजेंद्र गाडगीळ यांनी प्रदर्शनातील विविध पोस्टर्स आणि छायाचित्रांच्या माध्यमातून पक्षी व शेती यांच्यातील अतूट नात्याची माहिती उपस्थितांना दिली.
गाडगीळ दांपत्याने पक्षी हे केवळ निसर्गाचे सौंदर्य नसून शेतीचे खरे रक्षक असल्याचे पटवून दिले. पिकांचे नुकसान करणाऱ्या अळ्या, किडे आणि उंदरांवर नियंत्रण ठेवण्यात पक्ष्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. विविध पक्षी नैसर्गिकरीत्या कीड नियंत्रणाचे काम करून शेतकऱ्यांचे नुकसान कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे पक्ष्यांचे संवर्धन करणे म्हणजे शेती आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे होय, हा संदेश उदाहरणे व आकडेवारीसह देण्यात आला.
शेतीच्या शाश्वत विकासासाठी पक्ष्यांचे अस्तित्व टिकवणे किती आवश्यक आहे, याची जाणीव या प्रदर्शनातून ग्रामस्थांना करून देण्यात आली. पाडव्याच्या पारंपरिक आनंदाला पर्यावरण संवर्धनाची जोड देणारा हा उपक्रम विशेष ठरला. या प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी निसर्ग मित्रचे कार्यकर्ते पक्षीमित्र महांगडे, शिल्पा गाडगीळ यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ डॉ. राहुल मोरे, निलेश मराठे, राकेश भोई, प्रदीप मराठे, कल्पेश महाजन, प्रवीण मराठे, रोशन मराठे, प्रदीप टांगळे व अन्य सहकाऱ्यांनी सहकार्य केले. उपस्थितांचे आभार शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी मानले.