जळगावात २३ ते २७ जानेवारी दरम्यान बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन..

जळगाव : जळगांव येथील भरारी फाऊंडेशन आणि क्रेडाई संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बहिणाबाई महोत्सवाचे जळगावात दिनांक २३ ते २७ जानेवारी २०२६ सागर पार्कवर, आयोजन करण्यात आल्याची माहिती भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी आणि विनोद ढगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी दोन्ही संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.खान्देशाच्या सांस्कृतिक चळवळीला बळ देणारा बचत गटाच्या महिलांना व लघु उद्योजकांना आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्वपुर्ण ठरलेला बहिणाबाई महोत्सवाचे यंदा ११ व वर्ष आहे.

खान्देशातील महिला बचत गट व लघु उद्योजकांनी निर्माण केलेल्या वस्तुंना हक्काची बाजार पेठ निर्माण व्हावी, त्यांनी निर्माण केलेल्या वस्तुंना योग्यतो भाव मिळावा व त्यातुन त्यांची आर्थिक उन्नती व विकास व्हावा. हा मुळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.बहिणाबाई महोत्सवाचे खास आकर्षण म्हणजे बहिणाबाई खाद्य महोत्सव बचत गटाने तयार केलेल्या विविध खाद्य पदार्थाना जळगांव नागरीकांची विशेष मागणी असते भरीत भाकरी, शेवभाजी, खापरावरची पुरणपोळी सह खान्देशातील विविध खाद्य पदार्थांचा या महोत्सवाच्या निमित्ताने जळगांवकर नागरीक आस्वाद घेत असतात.यावर्षीच्या बहिणाबाई महोत्सवात विशेष आकर्षण म्हणजे बाबा सत्यनारायण मौर्य यांचा “भारत माता कि आरती” हा कार्यक्रम होणार आहे. तसेच “ही लावणी महाराष्ट्राची” सुप्रसिद्ध लावणी कलावंत शशिकांत सरवदे बीड सादर करणार आहे. तर दोंडाईचा येथील प्रसिद्ध कीर्तनकार रविकिरण महाराज यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचे या महोत्सवात विशेष आकर्षण असणार आहे. दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी साज मेकअप स्टुडिओ यांच्या वतीने “मराठी संस्कृतीचा फॅशन शो” चे आयोजन या महोत्सवात करण्यात आलेले आहे. खान्देशातील विविध लोककला शाहीरी, भारूड, लोकगीते, लोकनृत्य, वहीगायन, आदी लोककलांबरोबरच शालेय व महाविद्यालयीन युवा कलावंतांना आपली कला सादर करण्यासाठी बहिणाबाई महोत्सवाचा सांस्कृतिक मंच खुला ठेवण्यात आला आहे.
सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय, उद्योग व महिला विकासाच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी बहिणाबाई पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. खान्देशासह राज्यभरात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना बहिणाबाई पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.गत दहा वर्षात जळगांव शहरातील नागरीकांसह जिल्हाभरातुन मोठ्या संख्येने नागरीकांनी हजेरी लावली आहे. यावर्षी देखील अंदाजे १ लाख नागरीक या महोत्सवाला भेट देतील असा अंदाज असुन त्यानुसार संपुर्ण महोत्सवाचे आयोजन नियोजन करण्यात आले आहे.बहिणाबाई महोत्सवाच्या अकराव्या वर्षाचे आयोजन विविध कार्यक्रमासह खाद्य संस्कृती व लोककलेच्या जागराने रंगणार असून जळगावकर नागरिकांनी मोठ्या संख्येने या महोत्सवात हजेरी लावून जळगावच्या सर्वात मोठ्या लोक उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे