15 हजाराची लाच : वनविभागाच्या वनपालासह खाजगी पंटर ACB च्या जाळ्यात..

रावेर: वनविभागातील अहिरवाडी वनक्षेत्रातील वनपालासह एका खाजगी पंटर ला १५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले असून राजेंद्र अमृत सरदार (वनपाल, अहिरवाडी) व खाजगी इसम दीपक रघुनाथ तायडे (रा. अहिरवाडी) असे त्याचे नावे आहेत.या कारवाईने लाच खोरांच्या गोठ्यात खळबळ उडाली आहे.
तक्रारदार हे रावेर-यावल वनविभागात वनरक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यक्षेत्रातील रोपवाटिकेच्या कामाची तपासणी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी केली होती. या कामात त्रुटी काढून तक्रारदाराचे निलंबन होऊ शकते, अशी भीती राजेंद्र अमृत सरदार वनपाल अहिरवाडी, याने घातली. हे निलंबन टाळण्यासाठी वरिष्ठांना पैसे द्यावे लागतील, असे सांगून त्याने १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी वनपालाने खाजगी इसम दीपक रघुनाथ तायडे याची मदत घेतली. तक्रारदाराने एका मित्राच्या माध्यमातून १३,२५० रुपये आरोपी दीपक तायडे याच्या ‘फोन पे’ वर पाठवले. तायडेने ही रक्कम एटीएममधून काढून वनपाल राजेंद्र सरदार याला दिली.उर्वरित १,७५० रुपये तक्रारदाराने वनपालाच्या अहिरवाडी येथील शासकीय निवासस्थानी जाऊन ८ सप्टेंबर २०२४ रोजी रोख स्वरूपात दिले. गंभीर बाब म्हणजे १५ हजार रुपये लाच देऊनही १२ सप्टेंबर २०२४ रोजी तक्रारदार वनरक्षकाचे निलंबन करण्यात आले. त्यानंतर पुन्हा निलंबनातून मुक्त करण्यासाठी वनपालाने पैशांची मागणी केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवली. मिळालेल्या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर, जळगाव एसीबीच्या पथकाने कारवाई करत २० जानेवारी रोजी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगावचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या पथकाने केली.