कृषि विज्ञान केंद्र जळगाव ला केंद्रीय कृषिमंत्री यांची भेट व शेतकऱ्यांशी साधला थेट संवाद..
जळगाव – केंद्रीय कृषिमंत्री माननीय शिवराज सिंग चव्हाण यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद फार्म जळगाव येथे भेट दिली त्यावेळी त्यांच्यासोबत जळगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश भोळे, अटारी पुणे चे शास्त्रज्ञ डॉ. तुषार आठरे व डॉ.टी.राजेश उपस्थित होते. प्रथमतः केंद्रीय कृषिमंत्री यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या फार्मवरील सोयाबीन तूर मूग उडीद बांबू पोषण परसबाग प्रात्यक्षिके, शेतकरी निवास व विविध प्रात्यक्षिक युनिट आदींना भेटी देऊन शास्त्रज्ञांशी संवाद साधला.
यावेळी कृषी विज्ञान केंद्र ने आयोजित केलेल्या प्रदर्शनी मधील जळगाव जिल्ह्यातील केळी, कापूस, मोसंबी, झेंडू, शेवंती, निशिगंध, पानवेल, काकडी, मिरची, टोमॅटो, कारली, मोह मूल्यवर्धन इ. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले उत्पादन, विविध कृषी उद्योजकांचे केळी, मिलेट मूल्यवर्धित उत्पादने तसेच कृषी विज्ञान केंद्रातील विविध कृषी यंत्र अवजारांचे प्रदर्शनीला भेट देऊन सविस्तरपणे माहिती घेतली. त्यानंतर कृषी विज्ञान केंद्राच्या विविध कार्यक्रमाचे लाभार्थी शेतकऱ्यांशी सुसंवाद साधला. यामध्ये कृषी विज्ञान केंद्राने बजावलेल्या भूमिका त्यामधून शेतकऱ्यांना झालेला फायदा, तसेच जिल्ह्यातील महत्त्वाच्या पिकांमध्ये आवश्यक तंत्रज्ञान प्रसारण मध्ये कृषी विज्ञान केंद्राकडून झालेली मदत व शेतकऱ्यांच्या सामाजिक व आर्थिक बाबींमध्ये झालेला बदल याबद्दल सविस्तरपणे जाणून घेतले.
यावेळी शेतकऱ्यांनी केळी निर्यात वाढावी म्हणून सुविधा उपलब्ध साठी अपेडा अंतर्गत बनाना क्लस्टर म्हणून जळगाव जिल्ह्याचा समावेश करणे, कापूस पिकातील बीटी तंत्रज्ञानावर आलेल्या संकटाचा विचार करून दादा लाड तंत्रज्ञान अंतर्गत सघन लागवड पद्धतीचा प्रचार व प्रसार, केळी पिक विमा बाबतच्या शासन स्तरावरील समस्या सोडवणे जिल्ह्यातील प्रलंबित ठिबक सिंचन सबसिडीचा प्रश्न अशा विविध विषयावरती मंत्री महोदयांना अवगत करून शेतकऱ्यांनी निवेदन दिली यानंतर अध्यक्ष भाषणामध्ये केंद्रीय कृषिमंत्री यांनी प्रत्येक श्वास शेतकऱ्यांसाठी काम करण्यासाठी अशा पद्धतीने आश्वासित केले. भारत सरकारच्या किसान सन्माननिधी एक रुपयातील पिक विमा मूल्यवर्धनासाठी प्रधानमंत्री मूल्यवर्धित योजना अशा एक ना अनेक शेती कल्याणाच्या योजना बद्दल सांगितले. शेतकऱ्यांनी मांडलेल्या प्रश्नावरती नक्कीच गांभीर्याने काम केले जाईल असेही आश्वासित केले. कृषी विज्ञान केंद्राने शेतकऱ्यांना विज्ञानाशी जोडण्याचा कार्य प्रभावीपणे करावे, नवनवीन तंत्रज्ञान, नवनवीन पिके, नवनवीन जाती व मूल्यवर्धन अशा तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार प्रभावीपणे करावा जळगाव जिल्ह्यातील उपस्थित सर्व शेतकऱ्यांची सुसंवाद साधून मला काम करण्यासाठी बऱ्याच गोष्टी मिळाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी कृषी विज्ञान केंद्र पाल व कृषी विज्ञान केंद्र बऱ्हाणपूर यांचे सर्व अधिकारी व कर्मचारी सुद्धा उपस्थित होते.
या कार्यक्रमावेळी जवळपास १५० शेतकरी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ हेमंत बाहेती कार्यक्रम समन्वयक व सूत्रसंचालन श्री किरण जाधव यांनी केले.