जळगावात नामांकित हॉटेल मधील हायप्रोफाइल जुगार अड्डयावर पोलिसांची धाड..

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्डयावर स्थानिक गुन्हे शाखेने मध्यरात्री छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या ८ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल १९,९७,००० रुपयांची रोकड आणि १३ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
जिल्ह्यात सुरू असलेल्या जुगाराच्या वाढत्या प्रमाणावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी एक विशेष पथक तयार केले.१० जुलैच्या रात्री गोपनीय मिळाल्यानुसार, जळगावातील हॉटेल रॉयल पॅलेस, जयनगर येथे रूम नंबर २०९ मध्ये काही व्यक्ती ‘तीन पत्ती’ (झन्ना मन्ना) नावाचा जुगार खेळत असल्याची खात्री करण्यात आली. ११ जुलैच्या मध्यरात्री १२:०१ ते १:०० वाजेच्या दरम्यान या ठिकाणी छापा टाकला असता, हॉटेलमधील रुम नंबर २०९ मध्ये ८ व्यक्ती जुगार खेळत असल्याचे दिसून आले. ही रूम मदन लुल्ला यांच्या नावावर आरक्षित होती.
छाप्यात पोलिसांनी जुगारासाठी वापरले जाणारे १९,९७,००० रुपयांची रोख रक्कम आणि विविध कंपन्यांचे १३ मोबाईल हँडसेट असा एकूण सुमारे २० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी सर्व ८ आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात सहायक फौजदार अतुल वंजारी यांच्या फिर्यादीनुसार रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास रामानंदनगर पोलीस करत आहेत.