प्रभाग ५ मध्ये पियूष पाटील यांची ऐतिहासिक रॅली; प्रचाराच्या अखेरच्या दिवशी उसळला जनसागर..

जळगाव, प्रतिनिधी I प्रभाग क्रमांक ५ च्या निवडणूक रणसंग्रामात प्रचाराच्या अंतिम दिवशी अपक्ष उमेदवार पियूष नरेंद्र पाटील यांनी काढलेली भव्य रॅली संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेणारी ठरली. ही रॅली केवळ प्रचाराची औपचारिकता न राहता, जनतेच्या प्रचंड सहभागामुळे ती एक अभूतपूर्व ‘जनसागर’ बनली. रस्तोरस्ती उसळलेली गर्दी, घोषणांचा गजर आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता या प्रभागातील राजकीय चित्र स्पष्टपणे बदलत असल्याचे दिसून आले.
या प्रभागात शिवसेना जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे यांच्यासारखा वजनदार उमेदवार समोर असतानाही, पियूष पाटील यांनी आपल्या आक्रमक जनसंपर्क, तरुणाईचा जोश आणि सामान्य नागरिकांशी असलेल्या थेट संवादाच्या जोरावर निवडणूक लढत अत्यंत चुरशीची बनवली आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यातील ही रॅली पाहता, प्रत्यक्ष मैदानात मात्र जनमत पियूष पाटील यांच्या बाजूने झुकल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.
‘कपबशी’च्या चिन्हाने शहर गाजले
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी पियूष पाटील यांनी आपल्या ‘कपबशी’ या निवडणूक चिन्हाच्या प्रचारासाठी काढलेल्या रॅलीत हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. रॅली ज्या-ज्या मार्गावरून गेली, तेथे डोकींचे समुद्र दिसत होते. रस्ते, चौक, गल्ल्या नागरिकांनी फुलून गेल्या होत्या. या अभूतपूर्व प्रतिसादामुळे विरोधी गोटात अस्वस्थता पसरल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.प्रभाग ५ चा राजा, पियूष पाटील”“कपबशीला मत, विकासाला साथ”अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
महिलांचे औक्षण, पुष्पवृष्टी आणि युवकांचा जल्लोष रॅलीचे स्वरूप एखाद्या विजयी मिरवणुकीसारखे भासत होते. ठिकठिकाणी माता-भगिनींनी घराबाहेर येत पियूष पाटील यांचे औक्षण केले. अनेक ठिकाणी घरांच्या गच्च्या, बाल्कनी आणि छतांवरून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.युवकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि जल्लोषामुळे प्रचाराचा शेवटचा दिवस प्रभागाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावा असा ठरला.
भंगाळे विरुद्ध पाटील : खऱ्या अर्थाने काटे की टक्कर
शिवसेना जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे यांच्यासारख्या अनुभवी आणि प्रस्थापित उमेदवारासमोर उभे राहत, एका तरुण नेतृत्वाने दिलेले हे आव्हान सध्या संपूर्ण शहरात चर्चेचा विषय बनले आहे.
विशेषतः युवक आणि महिलांची मोठी फळी पियूष पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिल्याचे या रॅलीतून स्पष्ट झाले. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता काही राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.