RTO पासिंगसाठी ७ हजारांची लाच : खासगी एजंट ACB च्या जाळ्यात..

जळगाव : कारचे कायमस्वरूपी पासिंग करून देण्यासाठी आरटीओ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नावाने ८,५०० रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर ७ हजार रुपये स्वीकारणाऱ्या खासगी एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. योगेश रामभाऊ पाटील, रा. आदर्शनगर, जुन्या आरटीओजवळ, जळगाव, असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. तो खान्देश मोटर्स शोरूममध्ये एजंट म्हणून काम करतो.
एसीबीच्या माहितीनुसार, तक्रारदार हे खासगी वकील असून दोन्ही पायांनी दिव्यांग आहेत. त्यांनी १ जुलै २०२६ रोजी खान्देश मोटर्स शोरूममधून मारुती कंपनीची अल्टो के-१० व्हीएक्सआय कार खरेदी केली होती. ३ ऑगस्ट रोजी संबंधित एजंट योगेश पाटील याच्यामार्फत कारची तात्पुरती नोंदणी करण्यात आली.तक्रारदारांनी कारमध्ये हॅण्डकिट बसवल्यानंतर १२ ऑगस्ट रोजी कायमस्वरूपी पासिंगसंदर्भात चौकशी करण्यासाठी आरटीओ कार्यालय गाठले. त्यावेळी योगेश पाटील याने आरटीओ कार्यालयातील साहेब व संबंधित टेबलवरील कर्मचाऱ्यांकडून काम करून देण्याच्या मोबदल्यात त्यांच्या नावाने सुरुवातीला १० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. त्यानंतर तडजोड होऊन ८,५०० रुपयांची मागणी करण्यात आली.
या प्रकरणी तक्रारदारांनी १७ ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार दिली. तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यावेळी योगेश पाटील याने ८,५०० रुपयांची मागणी करून तडजोडीनंतर ७ हजार रुपये स्वीकारण्यास संमती दर्शविल्याचे एसीबीने सांगितले. त्यानंतर १७ ऑगस्ट रोजी इच्छादेवी चौकातील बजाज टीव्हीएस शोरूम येथे सापळा रचण्यात आला. पंचांसमक्ष योगेश पाटील याने ७ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या कलम ७-अ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. या प्रकरणात आरटीओ अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष भूमिका काय आहे, याचाही तपास होण्याची शक्यता आहे.