जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात बोगस डॉक्टरांविरोधात पोलिसांची धडक कारवाई : अडावद आणि भुसावळात दोन गुन्हे..

जळगाव : जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था सांभाळतानाच नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर बाबींवरही लक्ष केंद्रित करत जळगाव पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्यात ‘प्रॉक्टिव्ह सर्व्हे’ सुरू केला आहे. वैध वैद्यकीय पदवी अथवा नोंदणी नसताना उपचार करणारे बोगस डॉक्टर, अनधिकृत गर्भपात केंद्रे तसेच डॉक्टरांच्या वैध प्रिस्क्रिप्शनशिवाय प्रिस्क्रिप्शन औषधांची विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याच्या दृष्टीने पोलिसांकडून माहिती संकलित केली जात आहे. या मोहिमेत अडावद आणि भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन कारवाया करण्यात आल्या आहेत.

अडावद पोलिसांनी १० ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १ वाजता मिळालेल्या माहितीच्या आधारे चोपडा तालुक्यातील वटार येथे छापा टाकला. यावेळी अरुपकुमार अजयकुमार आढळ (वय ४१, मूळ रा. २४ परगणा, पश्चिम बंगाल, सध्या रा. वटार) हा कोणतीही वैध वैद्यकीय पदवी किंवा नोंदणी नसताना ॲलोपॅथिक औषधे व इंजेक्शनद्वारे रुग्णांवर उपचार करताना आढळून आला.

पोलिसांनी त्याच्याकडील वैद्यकीय प्रमाणपत्रांची तपासणी केली असता ‘Council of Vocational and Research Training’ तसेच ‘Nikhil Bangiya Vidyapeeth’ यांची प्रमाणपत्रे वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी वैध नसल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळावरून स्टेथॉस्कोप, विविध औषधे, इंजेक्शन्स आणि वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम, १९६१ मधील कलम ३३ अन्वये गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर कारवाई सुरू आहे. दरम्यान, भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतही बोगस डॉक्टराविरोधात कारवाई करण्यात आली. जामनेर रोडवरील प्रीमियर हॉटेलसमोर असलेल्या ‘जनसेवा क्लिनिक’ येथे पोलिस पथकाने पाहणी केली असता डॉ. उमेश मधुकर सपकाळे हे कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना डॉक्टर म्हणून क्लिनिक चालवत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून संबंधित व्यक्तीला पुढील कारवाईसाठी पोलिस ठाण्यात आणले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पोलिसांच्या या मोहिमेत बोगस वैद्यकीय व्यवसायाबरोबरच PCPNDT Act, 1994 आणि MTP Act मधील तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या प्रकारांवरही लक्ष केंद्रित केले जात आहे. गर्भलिंग तपासणी, अनधिकृत गर्भपात किंवा अपात्र व्यक्तींकडून गर्भपात करण्यासारख्या गंभीर प्रकारांविरोधातही कारवाई केली जाणार आहे.

याशिवाय डॉक्टरांच्या वैध प्रिस्क्रिप्शनशिवाय स्टेरॉइड्स, हार्मोन्स, सेडेटिव्ह, झोपेच्या गोळ्या तसेच व्यसनाधीनता निर्माण करणारी आणि इतर प्रिस्क्रिप्शन औषधे विकणाऱ्या मेडिकल स्टोअर्सवरही पोलिसांकडून लक्ष ठेवले जात आहे.

‘नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना थारा नाही’ या भूमिकेतून जिल्हा पोलिसांनी सुरू केलेल्या या प्रॉक्टिव्ह सर्व्हेमुळे बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. आगामी काळात अशा प्रकारांविरोधात आणखी कारवाया होण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे