शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक आरोग्य सुविधांचा आज लोकार्पण सोहळा..
डोळ्यांच्या अत्याधुनिक युनिट्ससह बालकांच्या अतिदक्षता विभागाचे होणार उद्घाटन

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उभारण्यात आलेल्या विविध अत्याधुनिक वैद्यकीय प्रकल्पांचा आणि आरोग्य युनिट्सचा भव्य उद्घाटन सोहळा शुक्रवार दि. ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या नूतन प्रकल्पांचे लोकार्पण होणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगावच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात नेत्र शस्त्रक्रिया युनिटचे उद्घाटन होणार आहे. या युनिटमध्ये डोळ्यांच्या ऑपरेशन्ससाठी लागणारे सर्व सुविधा आहेत. तसेच नेत्र तपासणी व निदान युनिट ज्यात डोळ्यांचे आजार शोधण्यासाठी आणि त्यांचे इमेजिंग/तपासणी करण्यासाठीचे अत्याधुनिक यंत्र युनिट उपलब्ध आहे. याशिवाय बालरोग अतिदक्षता विभाग प्रकल्प ज्यात लहान मुलांच्या उपचारासाठी लागणाऱ्या साहित्याचा पुरवठा, स्थापना आणि तो प्रत्यक्षात चालू करून देण्याचा संपूर्ण प्रकल्प आहे. या प्रकल्पांशिवाय, ‘टर्नकी’ प्रकल्प म्हणजे असा प्रकल्प, ज्याचे ठेकेदाराने सर्व काम पूर्ण करून (सजावट, साहित्य पुरवठा व यंत्रसामग्री बसवून) वापरण्यासाठी थेट हस्तांतरित करायचे आहे त्याचेही उद्घाटन होईल.
या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन हे असणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. तसेच खा. स्मिता वाघ, राज्यसभा सदस्य उज्ज्वल निकम, महापौर दिपमाला काळे यांच्यासह शासकीय अधिकारी उपस्थित राहतील.या अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे जळगावकर नागरिकांना व बालकांसाठी उत्तम दर्जाचे उपचार मिळणार असून, या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकुर यांनी केले आहे.