घरगुती दिवाळी फराळ आता डाक विभागामार्फत परदेशात पाठवा : भुसावळ विभागातील ३२ उपडाकघरांसह २०८ शाखा डाकघरांत सुविधा उपलब्ध..

यावल ( प्रतिनिधी ) दिवाळी म्हटली की फराळाची गोडी आणि घरगुती पदार्थांचा सुगंध प्रत्येकाच्या मनात आनंद निर्माण करतो. मात्र, नोकरी,व्यवसाय किंवा अन्य कारणांमुळे परदेशात राहणाऱ्या आपल्या प्रियजनांना घरच्या हाताने बनवलेल्या दिवाळी फराळाची चव अनुभवता येत नाही. हीच उणीव दूर करण्यासाठी भारतीय डाक विभागाने नागरिकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आता घरच्या हाताने तयार केलेला खमंग दिवाळी फराळ डाक विभागा मार्फत थेट परदेशात पाठविता येणार आहे.
भारतीय डाक विभागाच्या या उपक्रमामुळे परदेशात वास्तव्यास असलेल्या नातेवाइकांना,मित्र परिवाराला आणि प्रियजनांना दिवाळीच्या आनंदात सहभागी करून घेणे शक्य होणार आहे. विशेषतः परदेशात राहणाऱ्या अनेकांना कौटुंबिक कारणांमुळे भारतात येऊन दिवाळी साजरी करता येत नाही. अशा नागरिकांच्या प्रियजनांपर्यंत घरगुती फराळ पोहोचविण्यासाठी डाक विभागाने ही सुविधा सुरू केली आहे.
या सुविधे अंतर्गत २५ किलो पर्यंतचा दिवाळी फराळ कॅनडा, संयुक्त अरब अमिराती (UAE), युनायटेड किंगडम (UK), सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, रशिया,आयर्लंड यांसह एकूण १२०देशांमध्ये पाठविण्याची सोय उपलब्ध आहे.पार्सलचे दर पॅकिंग,वजन आणि निवडलेल्या वाहतुकीच्या प्रकारानुसार निश्चित करण्यात येणार आहेत.
भुसावळ विभागातील मुख्य डाकघर तसेच सर्व ३२ उपडाकघरांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे पोस्टमनमार्फत घरूनच पार्सल स्वीकारण्याची सुविधाही देण्यात आली आहे. तसेच भुसावळ मुख्य डाकघरात नाममात्र शुल्कात दर्जेदार पार्सल बॉक्स पॅकिंगची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय देशांतर्गत पार्सल व स्पीड पोस्ट पाठविण्याची सुविधा भुसावळ विभागातील २०८ शाखा डाकघरांसह सर्वत्र उपलब्ध आहे.