जळगाव

वाळूमाफियांवर शहर वाहतूक शाखेची कारवाई : तरसोद फाट्यावर ३ ब्रास वाळूसह ३ लाखांचा डंपर जप्त

 

जळगाव | प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून, शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी तरसोद फाटा येथील पुलावर धडक कारवाई करत तीन ब्रास वाळूसह तब्बल ३ लाख रुपये किमतीचा सहा टायर डंपर जप्त केला आहे. या प्रकरणी चालक आणि मालकाविरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

दि. ३ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम हे पोलीस अंमलदार मिलिंद पाटील, गणेश घुगे आणि शुद्धोधन ढवळे यांच्यासह जिल्ह्यात विशेष गस्त घालत होते. यावेळी रात्री १२.१५ वाजेच्या सुमारास जळगावकडून भुसावळकडे जाणारा पिवळ्या रंगाचा सहा टायर डंपर (क्रमांक WB 29 A 5591) तरसोद फाटा येथील पुलावर संशयास्पदरीत्या जाताना दिसला. पोलिसांनी डंपर थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये तीन ब्रास वाळू आढळून आली.

पोलिसांनी १० हजार रुपये किमतीची वाळू आणि अंदाजे ३ लाख रुपये किमतीचा डंपर असा एकूण ३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चालक मोहन नथ्थू धामोडे (वय २४) आणि डंपर मालक पवन कैलास कोळी (वय २६), दोघेही रा. संभाजीनगर, साकेगाव, ता. भुसावळ यांच्याविरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २९४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) तसेच मोटार वाहन कायदा कलम १३०/१७७ व ३/१८१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापूर्वीही ट्रॅक्टरवर कारवाई

शहर वाहतूक शाखेने यापूर्वी २ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष गस्ती दरम्यान वैजनाथ, ता. एरंडोल येथील विलास भिवा पाटील (वय ५४) याला नदीकिनारी ट्रॅक्टरद्वारे वाळू खाली करताना पकडले होते. त्याच्याकडील ट्रॅक्टर क्रमांक MH 19 CY 2335 जप्त करून त्याच्याविरुद्ध धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३०७/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वाळूमाफियांना पोलिसांचा इशारा!

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांसह पोलीस व महसूल प्रशासनाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी नेमलेल्या पंटरांवरही लक्ष ठेवण्यात येणार असून, त्यांची माहिती मिळाल्यास त्यांच्याविरुद्धही कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांनी दिला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम व पोलीस अंमलदार शशिकांत तायडे, अमोल घुगे, नितीन पाटील, मिलिंद पाटील, गणेश घुगे आणि शुद्धोधन ढवळे यांनी केली.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे