जळगाव शहराच्या विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर!
आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या पाठपुराव्याला यश : शहरातील १९ प्रभागांतील विकासकामांसह प्रमुख प्रवेशमार्गांवर होणार प्रकाशव्यवस्था

जळगाव : जळगाव शहरातील मूलभूत सोयी-सुविधांचा विकास आणि नागरिकांना अधिक चांगल्या नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागामार्फत जळगाव महानगरपालिकेसाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ‘महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी-सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद’ या योजनेंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला असून, याबाबतचा शासन निर्णय दिनांक ५ नोव्हेंबर २०२६ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
जळगाव शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध कामांना निधी उपलब्ध व्हावा, यासाठी आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने शहराच्या विकासासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून जळगाव शहरातील १९ प्रभागांमधील विविध विकासकामे करण्यात येणार आहेत. यासोबतच शहरातील प्रमुख प्रवेशमार्गांवर प्रकाशव्यवस्था उभारण्यासाठीही निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील नागरी सुविधांमध्ये सुधारणा होण्यास मदत होणार असून, नागरिकांना अधिक सुरक्षित व सुविधाजनक वातावरण उपलब्ध होईल.
जळगाव शहराचा सर्वांगीण विकास हा आपला प्राधान्याचा विषय असून, शहरातील विविध भागांतील उर्वरित विकासकामांसाठीही भविष्यात शासनाकडून अधिकाधिक निधी उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील. तसेच शहरातील प्रलंबित रस्ते विकासकामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत, यासाठीही संबंधित यंत्रणांकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार आहे.
यावेळी जळगांव शहराच्या विकासासाठी निधी मंजूर केल्याबद्दल आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, मा. उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार, गिरीशभाऊ महाजन, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील, संजयजी सावकारे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
शहरातील प्रत्येक प्रभागाचा समतोल विकास, दर्जेदार रस्ते, मूलभूत नागरी सुविधा आणि नागरिकांचे जीवनमान उंचावणे हेच आमचे ध्येय आहे. जळगावच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू नये, यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू, अशी भूमिका आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी व्यक्त केली.