पारोळा पोलिसांची आगळीवेगळी कारवाई : ईकोच्या कॅटॅलिटिक कन्व्हर्टर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश..

पारोळा : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर म्हसवे गावाजवळ नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करत असताना पारोळा पोलिसांनी कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमधील मौल्यवान धातूंच्या घटकांची चोरी व अवैध व्यापार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. पारोळा पोलीस ठाणे आणि महामार्ग पोलीस केंद्र, पाळधी यांच्या संयुक्त कारवाईत दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या वाहनातून ईको कारचे तीन जुने सायलेंसर/कॅटॅलिटिक कन्व्हर्टर आणि सुमारे ५ ते ६ किलो ‘सायलेंसर माती’ अथवा कॅटॅलिटिक कन्व्हर्टर पावडर असा सुमारे ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
५ सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान DL-3-CBU-3358 क्रमांकाची निळ्या रंगाची मारुती सुझुकी वॅगनार संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी ती अडवून झडती घेतली. यावेळी आसीफ यामीन (२२, रा. गाझियाबाद, उत्तर प्रदेश) आणि आरीफ सलीम (२३, रा. अलीगड, उत्तर प्रदेश) हे दोघे आढळून आले.
ईको कारच का लक्ष्य?
प्राथमिक चौकशीत संशयितांकडून विशेषतः मारुती सुझुकी ईको वाहनांमधील कॅटॅलिटिक कन्व्हर्टर चोरीच्या पद्धतीने काढून त्यातील मौल्यवान घटकांचा व्यापार केला जात असल्याचे समोर आले आहे. ईको वाहनाची तुलनेने जास्त ग्राउंड क्लीअरन्स असल्याने वाहनाखाली सहज जाता येते आणि कन्व्हर्टर कमी वेळेत काढता येत असल्याने या वाहनांना लक्ष्य केले जात असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. कॅटॅलिटिक कन्व्हर्टरच्या आतील ‘हनीकॉम्ब’ रचनेवर प्लॅटिनम, पॅलेडियम आणि रोडिअम यांसारख्या मौल्यवान धातूंचा वापर केला जातो. या धातूंना बाजारात मोठी किंमत असल्याने कन्व्हर्टर चोरी करून त्यातील घटकांची विक्री करण्याचे प्रकार घडत आहेत.
मुंबई-ठाण्यातही चोऱ्यांचा संशय
प्राथमिक चौकशीत संशयितांनी मुंबई आणि ठाणे परिसरात अशाच प्रकारच्या चोऱ्या केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनांबाबत संबंधित ठिकाणी गुन्हे दाखल आहेत का, तसेच या टोळीचे आणखी सदस्य कोण आहेत, याची पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे.
जप्त करण्यात आलेला चोरीचा माल पुढे कोणाला विकला जात होता, त्यामागे कोणते व्यापारी किंवा मध्यस्थ आहेत आणि या टोळीचे नेटवर्क नेमके किती मोठे आहे, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.
टोळीचे नेटवर्क उघड होण्याची शक्यता
या कारवाईमुळे कॅटॅलिटिक कन्व्हर्टर चोरीची एक वेगळी पद्धत समोर आली आहे. संशयितांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या संपर्कातील व्यक्ती, चोरीचा माल खरेदी करणारे आणि त्यातील मौल्यवान धातूंची पुढे विल्हेवाट लावणारे नेटवर्क तपासण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
चोरीचा माल पुढे कुठे जात होता आणि या संपूर्ण व्यवहारामागे नेमके कोण आहे, याचा उलगडा पुढील तपासात होण्याची शक्यता आहे.
