जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला : २९ नोव्हेंबरला मतदान..
10 दिग्गज निवडणूक रिंगणाच्या बाहेर ?

जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. बँकेच्या २१ संचालक पदांसाठी २९ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, ३० नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २६ ऑक्टोबरपासून सुरू होत असल्याने इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना वेग येणार आहे.
जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या बँकेवर वर्चस्व मिळविण्यासाठी विविध राजकीय पक्ष आणि सहकार क्षेत्रातील नेत्यांकडून रणनीती आखली जाण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीतील सर्वपक्षीय पॅनलचा प्रयोग यंदाही होणार की राज्यातील सत्तासमीकरणानुसार महायुती स्वतंत्र पॅनल उभे करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
अर्ज प्रक्रियेला आजपासून सुरुवात
निवडणूक कार्यक्रमानुसार २६ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. २ नोव्हेंबर रोजी अर्जांची छाननी होईल. ३ नोव्हेंबर रोजी पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार असून, ३ ते १७ नोव्हेंबरदरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असेल
१८ नोव्हेंबर रोजी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करून चिन्हांचे वाटप करण्यात येईल. त्यानंतर प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
या निवडणुकीत विद्यमान चेअरमन संजय पवार यांच्यासह दहा संचालकांच्या निवडणूक उमेदवारी चा मुद्दा महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. सलग दहा वर्षे संचालक म्हणून कार्यकाळ पूर्ण केलेल्या व्यक्तींशी संबंधित सहकारी कायद्यातील तरतुदींच्या पार्श्वभूमीवर या नेत्यांच्या सहभागाबाबत चर्चा सुरू आहे.
यामध्ये विद्यमान चेअरमन संजय पवार,माजी मंत्री अनिल भाईदास पाटील, आमदार किशोर पाटील, माजी आमदार चिमणराव पाटील, आमदार अमोल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, ॲड. रवींद्र पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि माजी चेअरमन ॲड. रोहिणी खडसे यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, संबंधितांची अंतिम पात्रता अधिकृत निर्णय आणि लागू कायदेशीर तरतुदींनुसार स्पष्ट होणार आहे.
पॅनलच्या रचनेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष
मागील निवडणुकीत विविध राजकीय पक्षांतील नेत्यांनी एकत्र येत सर्वपक्षीय पॅनलची रचना केली होती. यंदा मात्र बदललेल्या राजकीय परिस्थितीत कोणती रणनीती स्वीकारली जाणार, हा कळीचा प्रश्न आहे. महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढविली जाणार की पुन्हा सर्वपक्षीय एकत्रीकरणाला प्राधान्य दिले जाणार, यावर निवडणुकीचे चित्र अवलंबून राहू शकते.
२१ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत उमेदवारांची निवड, मतदारसंघनिहाय समीकरणे आणि संभाव्य राजकीय आघाड्या निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल होण्यापासून माघारीच्या अंतिम दिवसापर्यंत जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची चिन्हे आहेत.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
– २६ ते ३० ऑक्टोबर: उमेदवारी अर्ज दाखल करणे
– २ नोव्हेंबर: अर्जांची छाननी
– ३ नोव्हेंबर: पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध
– ३ ते १७ नोव्हेंबर: उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत
– १८ नोव्हेंबर: अंतिम उमेदवार यादी व चिन्हांचे वाटप
– २९ नोव्हेंबर: सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान
– ३० नोव्हेंबर: सकाळी ९ वाजल्यापासून मतमोजणी व निकाल
जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी होणाऱ्या या निवडणुकीत कोणते नेते मैदानात उतरतात, कोणत्या गटांची मोट बांधली जाते आणि संचालक मंडळावर कोणाचे वर्चस्व प्रस्थापित होते, याचे उत्तर आता उमेदवारी प्रक्रियेनंतर स्पष्ट होणार आहे.