जळगाव

माऊली नगरात रक्तरंजित थरार : मध्यस्थी करायला गेलेल्या ४४ वर्षीय व्यक्तीचा चाकू हल्ल्यात मृत्यू..

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खेडी बुद्रुक येथील माऊली नगर परिसरात मोटारसायकलच्या लाईटवरून झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान रक्तरंजित घटनेत झाले. या वादातून चॉपरने हल्ला करून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली, तर दुसरा गंभीर जखमी झाला. २० ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडलेल्या या घटनेतील संशयित आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत ताब्यात घेतले. मयूर जाधव (रा. माऊली नगर, खेडी बुद्रुक, ता. जि. जळगाव) असे त्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी माऊली नगर परिसरात काही महिला बसलेल्या होत्या. त्याचवेळी मयूर जाधव हा मोटारसायकलवरून तेथे आला. त्याच्या मोटारसायकलचा लाईट चमकण्या च्या कारणावरून त्याला जाब विचारण्यात आला. याच मुद्द्यावरून वाद वाढला आणि त्यातून धारदार चॉपरने हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात किरण विठ्ठल पाटील (वय ४४) यांचा मृत्यू झाला, तर किशोर छगन पाटील (वय ३५, दोघेही रा. माऊली नगर, खेडी बुद्रुक) हे गंभीर जखमी झाले. किरकोळ कारणावरून घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी जखमी किशोर छगन पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. परिसरातील माहिती संकलित करण्यासोबतच तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. या तपासाच्या आधारे पोलिसांनी मयूर जाधव याला ताब्यात घेतले. घटनेनंतर अवघ्या २४ तासांत आरोपीला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकाने केली.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे