जळगाव

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर..

जळगाव दि.20 प्रतिनिधी : – “शब्दांना धार नव्हती आणि शाईत रक्त नव्हतं, पण आज जळगावच्या मातीने जे अनुभवलं, तो इतिहास लिहायला कदाचित शब्दही अपुरे पडतील!” श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, जळगाव विभागाच्या वतीने आयोजित ‘श्री दुर्गामाता महादौडीने’ आज, २० ऑक्टोबर रोजी जळगावच्या इतिहासात एका सुवर्ण पानाची नोंद केली. पहाटे ठीक ५:३० वाजता ‘श्री शिवतीर्थ’ कोर्ट चौकातून निघालेल्या या महादौडीत केवळ गर्दी नव्हती, तर तो धगधगत्या राष्ट्रभक्तीचा महापूर होता.

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. नंतर त्यांच्या हस्ते भगवा ध्वजाचे पूजन करून पुष्प वृष्टी करण्यात आली. यावेळी रुपाली वाघ, जैन इरिगेशनचे अनिल जोशी, पितांबर भावसार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

काळजात घर करणारे क्षण: गत जीवनातील मावळे पुन्हा जन्मले!

पहाटेच्या त्या काळ्याकुट्ट अंधारात, जेव्हा सबंध जग सुखाच्या झोपेत होतं, तेव्हा जळगावचे रस्ते ‘जगदंब, जगदंब’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या जयघोषाने थरथरले! कपाळावर चंद्रकोर, डोळ्यांत अंगार, हातात ताठ उभा असलेला भगवा झेंडा आणि अनवाणी पायाने रस्त्यावरून धावणारी हजारो तरुण पोरं… हे दृश्य पाहून उपस्थित प्रत्येकाचा ऊर अभिमानाने भरून आला आणि डोळे पाणावले. असं वाटत होतं की, साडेतीनशे वर्षांपूर्वी स्वराज्यासाठी छातीचा कोट करून लढणारे छत्रपती शिवरायांचे तेच गत जीवनातील निष्ठावंत मावळे आज या जळगावच्या मातीत धारकऱ्यांच्या रूपाने पुन्हा जन्मले आहेत.

“आजची उगवती पिढी जेव्हा मोबाईलच्या पडद्यावर आणि व्यसनाच्या दलदलीत स्वतःचं आयुष्य वाया घालवते आहे तेव्हा यात सहभागी मुलांना पहाटे उठवून त्यांच्या नसानसात राष्ट्रभक्तीचं रक्त सळसळवायला लावणारी ही संघटना आहे.

मातृशक्तीचा आणि बालगोपाळांचा अभूतपूर्व उत्साह

या महादौडीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आईसाहेब जिजाऊंचा वारसा सांगणाऱ्या हजारो माता-भगिनी आणि लहान मुले यामध्ये सामील झाली होती. जळगावकरांनी घराघरांसमोर पायघड्या घालून अथांग रांगोळ्या काढून आणि अश्रू भरल्या डोळ्यांनी धारकऱ्यांवर पुष्पवृष्टी करून या महादौडीचे स्वागत केले. जगदंब देवी मंडळात प्रांगणात जेव्हा हजारो धारकऱ्यांनी एका सुरात महाआरती केली तेव्हा जळगावची माती धन्य झाली.

हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रमुख आकाश फडे, तालुका प्रमुख परीस महाराज, शहर प्रमुख विजय कासार, दौड प्रमुख योगेश्वर गुरुजी यांच्यासह असंख्य धारकऱ्यांनी महादौडच्या मार्गाची आणि संपूर्ण प्रशासकीय नियोजनाची तयारी अत्यंत देखणी व सुंदर केली होती.येत्या १ नोव्हेंबर ला आढावा बैठकीचे निमंत्रण दिले या वर्षीची मोहिम सांगली वरून गुरुजींनी निरोप दिला की श्री पन्हाळगड ते श्री विशाळगड मार्गे पावनखिंड सर्व धारकरी पुढील मोहिमेच्या नियोजनात लागले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे