सातपुड्याच्या दुर्गम वाघझिरा गावातील आदिवासी कन्येची एम.डी. (रेडिओलॉजी) परीक्षेत यशस्वी भरारी..
डॉ. मोहिनी भुगवाड्या यांना ७० टक्के गुण; गावातील पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान.

यावल (प्रतिनिधी) : यावल तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमधील अतिदुर्गम वाघझिरा गावातील आदिवासी कुटुंबातील कन्या कु. मोहिनी नवादी मालसिंग भुगवाड्या यांनी वैद्यकीय शिक्षणात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. एम.बी.बी.एस.चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी एम.डी. (रेडिओलॉजी) परीक्षेत ७० टक्के गुण मिळवून यश मिळविले आहे. त्यांच्या या यशामुळे वाघझिरा गावासह संपूर्ण आदिवासी समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील वाघझिरा या छोट्याशा गावातून वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात झेप घेत मोहिनी यांनी आपल्या जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर हे यश मिळविले. त्यांनी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एम.बी.बी.एस.चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई येथे एम.डी. (रेडिओलॉजी) परीक्षेत ७० टक्के गुण मिळवून यश संपादन केले. वाघझिरा गावातून डॉक्टर होणाऱ्या त्या पहिल्या महिला असल्याचे सांगण्यात येत आहे.
मोहिनी यांचे वडील मालसिंग भुगवाड्या हे नायगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत, तर त्यांच्या आई मालोद, ता. यावल येथील आरोग्य उपकेंद्रात आरोग्यसेविका म्हणून सेवा बजावत आहेत. आई-वडिलांकडून मिळालेली शिक्षणाची प्रेरणा, कुटुंबाचे पाठबळ आणि स्वतःची मेहनत यांच्या जोरावर मोहिनी यांनी हे यश मिळविले.
आदिवासीबहुल आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसमोर शिक्षणासाठी अनेक अडचणी असतात. मात्र, या अडचणींवर मात करून मोहिनी यांनी वैद्यकीय शिक्षणात मिळविलेले यश परिसरातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.
डॉ. मोहिनी भुगवाड्या यांच्या या यशाबद्दल आदिवासी समाजबांधवांसह परिसरातील नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या यशामुळे वाघझिरा गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, दुर्गम भागातील मुलीही जिद्द, मेहनत आणि शिक्षणाच्या बळावर मोठी शिखरे गाठू शकतात, हे त्यांनी सिद्ध केले आहे.