पाळधी-तरसोद बायपासवर पुन्हा अपघात : आयशरच्या धडकेत नवविवाहित तरुणाचा मृत्यू..

जळगाव (प्रतिनिधी) : पाळधी-तरसोद बायपासवरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून, आता आणखी एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. पाळधी येथील रेल्वे पुलावर आयशर मालवाहू वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत योगेश गजमल राक्षे या तरुणाचा मृत्यू झाला. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी विवाहबंधनात अडकलेल्या योगेश यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. योगेश राक्षे हे आव्हाणे येथील खताच्या गोदामात मजुरीचे काम करत होते. काम आटोपून दुचाकीने घरी परतत असताना पाळधी रेल्वे पुलावर समोरून येणाऱ्या आयशर मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, नव्याने संसार सुरू केलेल्या कुटुंबाचा आधार हरपल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.
पाळधी-तरसोद बायपासवर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे या मार्गावरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ३० जुलै रोजी आसोदा पुलाचा भराव धसल्यानंतर बायपासवरील वाहतूक बंद करण्यात आली होती. परिणामी, अवजड वाहनांची वाहतूक जळगाव शहरातून वळवण्यात आली. या बदललेल्या वाहतूक व्यवस्थेमुळे पर्यायी मार्गांवरील सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त होत आहे.उपलब्ध माहितीनुसार, या मार्गावर अपघातांच्या घटनां मध्ये १३ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
या अपघातप्रकरणी पोलिसांनी आयशर वाहनचालक धर्मेंद्र प्रवीण सिंग गोयल याला ताब्यात घेतले आहे. मात्र, एका अपघातानंतर कारवाई करण्यापुरते मर्यादित न राहता या मार्गावरील अपघातांची कारणे शोधून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.अवजड वाहनांच्या वाहतुकीचे योग्य नियोजन, वेगावर नियंत्रण, धोकादायक ठिकाणी पुरेशा सूचना फलकांची व्यवस्था आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना केल्यास अपघातांचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते. आणखी किती जीव गेल्यानंतर प्रशासन या मार्गाच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलणार, असा सवाल या घटनांच्या पार्श्वभूमीवर उपस्थित होत आहे.