जळगाव

10 हजाराची लाच : ZP बांधकाम विभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यासह कनिष्ठ अभियंता ACB जाळ्यात..

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा परिषदेमधील बांधकाम विभागात लाचखोरीचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पिंप्री खुर्द (ता. धरणगाव) येथील गावांतर्गत रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामाचे बिल मंजूर करून पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी केल्याप्रकरणी जिल्हा परिषद बांधकाम उपविभागातील उपविभागीय अधिकारी सतीष मनसुलाल शिसोदे आणि कनिष्ठ अभियंता भागवत वसंता चवरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. सोमवारी ही कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागात खळबळ उडाली आहे.

९.९० लाखांचे काम, बिलासाठी लाचेची मागणी

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सबकंत्राटदार असून त्यांनी सन २०२५-२६ मध्ये धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे गावांतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण केले होते. या कामाची एकूण रक्कम ९ लाख ९० हजार ७६३ रुपये होती. काम पूर्ण झाल्यानंतर त्याची मोजणी पुस्तिका (एमबी) तयार करणे आणि बिले बनविण्यासाठी कनिष्ठ अभियंता भागवत चवरे यांनी तक्रारदाराकडून यापूर्वी २० हजार रुपये स्वीकारल्याचे तक्रारीत नमूद आहे. मात्र, काम पूर्ण होऊनही संबंधित बिले मंजूर झाली नसल्याने तक्रारदाराने बांधकाम उपविभागाच्या कार्यालयात जाऊन विचारणा केली.

तक्रारीनुसार, कामाच्या बिलांवर स्वाक्षरी करून ती पुढील मंजुरीसाठी जिल्हा परिषद जळगाव येथे पाठविण्याच्या मोबदल्यात उपविभागीय अधिकारी सतीष शिसोदे यांच्यासाठी एकूण बिलाच्या १.५ टक्के प्रमाणे १५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती.या मागणीविरोधात तक्रारदाराने २ नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जळगाव कार्यालयात तक्रार दाखल केली. त्यानंतर पंचांच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या पडताळणीदरम्यान सुरुवातीला १५ हजार रुपयांची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तडजोडीअंती १ टक्के प्रमाणे १० हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविण्यात आल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीत नमूद आहे.

कनिष्ठ अभियंत्याने स्वीकारले : उपविभागीय अधिकाऱ्यानेही घेतली रक्कम

२ नोव्हेंबर रोजी बांधकाम उपविभागाच्या कार्यालयात सापळा कारवाई करण्यात आली. यावेळी कनिष्ठ अभियंता भागवत चवरे यांनी तक्रारदाराकडून पंचांसमक्ष १० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारून ती उपविभागीय अधिकारी सतीष शिसोदे यांच्याकडे दिली. त्यानंतर शिसोदे यांनीही ही रक्कम स्वीकारून स्वतःकडे घेतल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नमूद केले आहे.त्यानंतर संबंधित लाचेची रक्कम शिसोदे यांच्याकडून पंचांसमक्ष जप्त करण्यात आली. या कारवाईमुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागातील कथित भ्रष्टाचाराचा प्रकार उघडकीस आला आहे.

अंगझडतीत मोबाईलसह रोख रक्कम

कारवाईदरम्यान दोन्ही अधिकाऱ्यांच्या अंगझडतीत मोबाईल फोन आणि रोख रक्कम आढळून आली. उपविभागीय अधिकारी सतीष शिसोदे यांच्याकडे ॲपल कंपनीचा मोबाईल फोन आणि ९१ हजार ६२० रुपये रोख रक्कम मिळाली. तर कनिष्ठ अभियंता भागवत चवरे यांच्याकडे विवो कंपनीचा मोबाईल फोन आणि २० हजार ६०० रुपये रोख रक्कम आढळून आली.मात्र, अंगझडतीत आढळलेली ही संपूर्ण रोख रक्कम लाचेच्या प्रकरणाशी संबंधित असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती

दरम्यान, शासकीय कामांची बिले मंजूर करण्यासाठी लाचेची मागणी होत असल्याच्या या प्रकारामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागातील कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाच्या पुढील तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे