ब्रेकिंग

जिद्द,संयम आणि संघर्षातून घडली यशोगाथा एम.डी. पदवी मिळवणाऱ्या डॉ.मनिषा महाजन यांचा प्रेरणादायी प्रवास..

यावल (प्रतिनिधी )- किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रमार्फत रुग्णांची सेवा तर मुंबईतील नायर रुग्णालयापर्यंतचा डॅा.मनिषा महाजन यांचा प्रेरणादायी प्रवास ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा बजावताना समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत, वयाच्या ३७ व्या वर्षी पुन्हा उच्च शिक्षणाचा ध्यास घेऊन एम.डी. सायकियाट्री ही पदव्युत्तर पदवी संपादन करणाऱ्या डॉ. मनिषा महाजन यांच्या यशाचे जळगाव जिल्ह्यात कौतुक होत आहे. किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात सलग पाच वर्षे सेवा बजावल्यानंतर त्यांनी मुंबईतील नायर रुग्णालयात मानसोपचार शास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यांचा हा प्रवास ग्रामीण भागातील वैद्यकीय अधिकारी, विद्यार्थी आणि महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.डॉ. मनिषा महाजन यांनी एमबीबीएसनंतर सुमारे दहा वर्षे वैद्यकीय सेवा बजावल्यानंतर उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. ग्रामीण भागात काम करताना मानसिक आरोग्याच्या समस्यांचे गांभीर्य आणि रुग्णांना अधिक तज्ज्ञ उपचारांची असलेली गरज त्यांच्या लक्षात आली. मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात अधिक सखोल ज्ञान संपादन करून रुग्णांना दर्जेदार सेवा देता यावी, या उद्देशाने त्यांनी मुंबईतील नायर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एम.डी. सायकियाट्री या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवला.

वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणाचा प्रवास अत्यंत आव्हानात्मक असतो. रुग्णसेवेचा मोठा ताण, रात्रपाळ्या, अपुरी झोप, नियमित अभ्यास, परीक्षा आणि रुग्णालयातील विविध जबाबदाऱ्या यांचा समतोल साधावा लागतो. अशा परिस्थितीत डॉ. महाजन यांनी आपले शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले.

या काळात त्यांनी व्यावसायिक जबाबदाऱ्यांसोबत कौटुंबिक जबाबदाऱ्याही सांभाळल्या. त्यांचा मुलगा कु. पृथ्वीराज याने याच वर्षी सीबीएसई (CBSE) बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत ८० % गुण मिळवले. याच काळात डॉ. महाजन यांनी आपल्या वैवाहिक जीवनाची नवी सुरुवात केली. कौटुंबिक जबाबदाऱ्या, आरोग्यविषयक अडचणी आणि वैद्यकीय शिक्षणाचा ताण अशा अनेक आव्हानांना सामोरे जात त्यांनी एम.डी. सायकियाट्रीची पदवी संपादन केली.

शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते आणि ध्येयाप्रती जिद्द असेल तर प्रतिकूल परिस्थितीतही यश मिळवता येते, हे डॉ. महाजन यांच्या प्रवासातून अधोरेखित होते.

*किंनगावमधील पाच वर्षांची सेवा; ग्रामीण आरोग्य व्यवस्थेत योगदान*

डॉ. महाजन यांनी किंनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात सलग पाच वर्षे वैद्यकीय सेवा बजावली. त्यांच्या कार्यकाळात किंनगाव येथील नवीन ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा ठरला.

ग्रामीण भागात सेवा बजावल्यानंतर पुन्हा उच्च शिक्षण घेण्याचा त्यांचा निर्णय वैयक्तिक प्रगतीपुरता मर्यादित नसून मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात अधिक सक्षमपणे काम करण्याच्या त्यांच्या ध्येयाशी संबंधित आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना मानसिक आरोग्यविषयक समस्या उद्भवल्यास त्यांचे वेळेवर निदान, समुपदेशन आणि योग्य उपचार मिळावेत, यासाठी प्रशिक्षित मानसोपचारतज्ज्ञांची उपलब्धता वाढणे आवश्यक आहे.

*कार्यकाळाच्या अखेरीस आयुष्मान भारतअंतर्गत भव्य आरोग्य शिबिर*

डॉ. मनिषा महाजन यांच्या किनगाव येथील कार्यकाळातील आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे उच्च शिक्षणासाठी मुंबईला रवाना होण्याच्या सुमारे एक महिना आधी आयुष्मान भारतअंतर्गत आयोजित करण्यात आलेले भव्य आरोग्य शिबिर.

या शिबिरात एकाच दिवशी सुमारे चार हजार नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. विविध वैद्यकीय विशेषज्ञांसह अनेक शाखांतील डॉक्टरांनी या शिबिरात सहभाग घेतला. त्यामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाले.

किनगाव परिसरातील नागरिकांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात आलेले हे आरोग्य शिबिर विशेष ठरले. स्थानिक नागरिकांनी प्रथमच अशा भव्य स्वरूपातील आरोग्य उपक्रमाचा अनुभव घेतला. ग्रामीण भागातील नागरिकांना विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

मोठ्या संख्येने नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या उपक्रमाचे डॉ. महाजन यांच्या वैद्यकीय सेवाकाळातील महत्त्वपूर्ण कार्य म्हणून कौतुक होत आहे.यशामागे आई, पती आणि मुलाची मोलाची साथ डॉ. मनिषा महाजन यांच्या या यशामागे त्यांच्या कुटुंबीयांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या आई श्रीमती प्रमिला महाजन, पती श्री. अनिरुद्ध महाजन आणि मुलगा कु. पृथ्वीराज यांनी त्यांच्या या कठीण प्रवासात मोलाची साथ दिली.

वैद्यकीय शिक्षणातील व्यस्त दिनक्रम, रात्रपाळ्या, अभ्यासाचा ताण आणि आरोग्यविषयक अडचणींच्या काळात कुटुंबीयांनी त्यांना मानसिक आधार दिला. त्यांच्या ध्येयाचा आदर करत त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. या तिघांनी दिलेल्या प्रेमाची, सहकार्याची आणि समजुतीची डॉ. महाजन मनापासून कृतज्ञता व्यक्त करतात.तसेच मुंबईतील नायर वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, मार्गदर्शक, वरिष्ठ डॉक्टर, कनिष्ठ सहकारी आणि सहाध्यायी यांच्या सहकार्याबद्दलही त्यांनी आभार व्यक्त केले आहेत. या सर्वांच्या मार्गदर्शनामुळे आणि सहकार्यामुळे आपला शैक्षणिक प्रवास अधिक समृद्ध झाला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

*ग्रामीण भागात मानसिक आरोग्यसेवेच्या नव्या संधींची अपेक्षा*

मानसिक आरोग्याबाबत जागरूकतेचा अभाव, सामाजिक गैरसमज आणि तज्ज्ञ उपचारांची मर्यादित उपलब्धता ही ग्रामीण भागातील महत्त्वाची आव्हाने आहेत. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवेचा अनुभव आणि मानसोपचारशास्त्रातील विशेष पदव्युत्तर शिक्षण यांचा संगम डॉ. महाजन यांच्या पुढील कार्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.मानसिक आरोग्य जनजागृती, नैराश्य व चिंताविकारांचे निदान आणि उपचार, व्यसनमुक्ती, समुपदेशन तसेच आत्महत्या प्रतिबंधक उपक्रम अशा क्षेत्रांत ग्रामीण जनतेला अधिक चांगल्या सेवा मिळण्याची अपेक्षा आहे.डॉ. महाजन यांनी पुन्हा जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात येऊन आपल्या अनुभवाचा आणि नव्याने संपादन केलेल्या विशेष ज्ञानाचा उपयोग स्थानिक नागरिकांच्या मानसिक आरोग्यासाठी करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवेपासून मुंबईतील पदव्युत्तर शिक्षणापर्यंतचा त्यांचा प्रवास आणि किनगाव येथे आयोजित केलेले भव्य आरोग्य शिबिर या दोन्ही बाबी त्यांच्या वैद्यकीय कार्यातील सामाजिक बांधिलकी अधोरेखित करतात. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी जळगाव जिल्ह्यातून शुभेच्छा व्यक्त  केल्या.

जिद्द,संयम आणि संघर्षातून घडली यशोगाथा एम.डी. पदवी मिळवणाऱ्या डॉ.मनिषा महाजन यांचा प्रेरणादायी प्रवास..

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे