यावल

अंजाळे मोर नदीच्या पुलावर भीषण अपघात : तरुणाचा जागीच मृत्यू..

टायर फुटल्याने नवविवाहित शुभम पाटील यांचा दुर्दैवी अंत : अपघातांच्या मालिकेमुळे नागरिक संतप्त

यावल (प्रतिनिधी) : भुसावळ–यावल मार्गावरील अंजाळे गावाजवळ मोर नदीच्या पुलावर झालेल्या भीषण अपघातात ३० वर्षीय तरुण अभियंत्याचा जागीच मृत्यू झाला. शुभम पाटील असे मृत तरुणाचे नाव असून, दुचाकीचा अचानक टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. गुरुवार, दि. ३० ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टायर फुटल्याने दुचाकीचा भीषण अपघात

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शुभम पाटील (वय ३०, रा. विरावली, ता. यावल, सध्या पांडुरंग सराफ नगर, यावल) हे आपल्या दुचाकीने (क्रमांक एमएच १९ डीएन २८०९) भुसावळहून यावलकडे येत होते. अंजाळे गावाजवळील मोर नदीच्या पुलावरून जात असताना त्यांच्या दुचाकीचा टायर अचानक फुटला. त्यामुळे दुचाकीचा अपघात होऊन शुभम यांचा जागीच मृत्यू झाला.शुभम यांच्या अपघाती मृत्यूची बातमी त्यांच्या मूळ गावी विरावली येथे पोहोचताच गावावर शोककळा पसरली. ते पाटील कुटुंबातील एकुलते एक पुत्र होते. नवविवाहित शुभम यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अपघातानंतर शुभम यांचा मृतदेह यावल येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. तेथे मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोर नदीचा पूल ठरतोय अपघातांचा सापळा!

दरम्यान, अंजाळे गावाजवळील मोर नदीच्या पुलावर वारंवार अपघात होत असल्याने वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पुलावरील धोकादायक वळणामुळे यापूर्वीही अनेक अपघात घडले असून, काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याचे सांगितले जात आहे.पुलावरील वळणाची रचना योग्य नसल्याने या ठिकाणी अपघातांचा धोका वाढत असल्याची तक्रार वाहनचालकांकडून केली जात आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांनंतरही या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना का केल्या जात नाहीत, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

आणखी किती जणांचे बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार?

अंजाळे येथील मोर नदीच्या पुलावरील धोकादायक वळणाची तातडीने पाहणी करून आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दिशादर्शक फलक, योग्य सूचना, रस्त्यावरील सुरक्षा व्यवस्था आणि वळणाच्या रचनेची तांत्रिक तपासणी करून भविष्यातील अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे