जिल्हा बँक निवडणूक! विद्यमान अध्यक्ष संजय पवार, आमदार अनिल पाटील, आमदार पुत्र सुमित पाटील यांचे उमेदवारी अर्ज बाद..

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. तब्बल ४०२ उमेदवारी अर्जांपैकी ९३ अर्ज अवैध ठरविण्यात आले असून, यामध्ये बँकेचे विद्यमान अध्यक्ष संजय पवार, आमदार अनिल पाटील आणि आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांच्या अर्जांचा समावेश आहे. प्रमुख राजकीय नेत्यांच्या उमेदवारीला छाननीतच ब्रेक लागल्याने जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उमेदवारी अर्जावर घेण्यात आलेली हरकत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळल्याने त्यांचा अर्ज वैध ठरला आहे. त्यामुळे एकीकडे दिग्गजांचे अर्ज बाद, तर दुसरीकडे रक्षा खडसेंना दिलासा, असे चित्र जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पाहायला मिळत आहे.
संजय पवार आणि अनिल पाटलांना धक्का
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी विविध मतदारसंघांतून ४०२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननी प्रक्रियेत त्यापैकी ९३ अर्ज अवैध ठरविण्यात आले. विशेष म्हणजे, विद्यमान अध्यक्ष संजय पवार आणि आमदार अनिल पाटील यांचे अर्जही बाद झाल्याने निवडणुकीच्या राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. या दोन्ही नेत्यांच्या पुढील भूमिकेकडे आता सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
सुमित पाटील यांच्या अर्जावर हरकत
पाचोरा तालुक्यातील प्राथमिक कृषी पतपुरवठा विकास सेवा संस्था मतदारसंघातून आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या अर्जावर सतीश परशुराम शिंदे यांनी हरकत घेतली होती. पात्रतेच्या मुद्द्यावर उपस्थित करण्यात आलेल्या या हरकतीनंतर छाननी प्रक्रियेत सुमित पाटील यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. त्यामुळे आमदार किशोर पाटील यांच्या राजकीय गोटातही या निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे.
रक्षा खडसेंना मोठा दिलासा
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उमेदवारी अर्जावर त्या जिल्हा बँकेच्या थकबाकीदार असल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी मनोज चौधरी यांनी संबंधित हरकतीवर सुनावणी घेतल्यानंतर ती फेटाळून लावली. परिणामी, रक्षा खडसे यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरला असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अपिलासाठी तीन दिवसांची मुदत
छाननीमध्ये अर्ज अवैध ठरलेल्या उमेदवारांना या निर्णयाविरोधात अपील दाखल करण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. संबंधित उमेदवारांना नाशिक विभागीय सहनिबंधकांकडे अपील करता येणार आहे. त्यामुळे संजय पवार, अनिल पाटील आणि सुमित पाटील हे या निर्णयाला आव्हान देतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकूणच, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत छाननी प्रक्रियेतच अनेक दिग्गजांना धक्का बसल्याने निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. आता अपील प्रक्रियेत कोणाला दिलासा मिळतो आणि कोणाची उमेदवारी कायमची बाद होते, यावर जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील पुढील राजकीय गणिते अवलंबून राहणार आहेत.