महापौरांच्या पाहणीत अनधिकृत गोठे, अतिक्रमण आणि अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर : दंडात्मक कारवाईचे आदेश..
वॉर्ड क्रमांक १७ मध्ये महापौर दीपमाला काळे यांचा दौरा; गटारी, नाले स्वच्छ करण्यासह अनधिकृत बांधकामे हटविण्याचे निर्देश

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरातील स्वच्छता आणि नागरी समस्यांच्या पाहणीसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘महापौर स्वच्छता संकल्प अभियान’ अंतर्गत महापौर दीपमाला काळे यांनी मंगळवारी (दि. ३ नोव्हेंबर) वॉर्ड क्रमांक १७ मधील विविध भागांचा दौरा केला. यावेळी परिसरातील अस्वच्छता, अनधिकृत गोठे, अतिक्रमण आणि प्रलंबित गटारींच्या प्रश्नांवर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले.
मेहरूण परिसरातील साईबाबा मंदिराजवळ पाहणी करताना जुन्या मुत्रालयामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचे निदर्शनास आले. हे मुत्रालय तातडीने हटवून त्या जागेवर नागरिकांच्या बसण्यासाठी बाकडे ठेवावेत, तसेच परिसरातील गटारींची स्वच्छता करावी, अशा सूचना महापौरांनी दिल्या.
एमआयडीसी रस्त्यावरील जुन्या बुरुजासमोर महापालिकेच्या जागेवर गाई-म्हशींचे अनधिकृत गोठे उभारण्यात आल्याचे तसेच त्या ठिकाणी व्यवसाय सुरू असल्याचे आढळले. याप्रकरणी महापौरांनी संबंधितांना जाब विचारला. परिसरात अस्वच्छता पसरविल्याप्रकरणी जागेवरच दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच महापालिकेची ही मोकळी जागा तातडीने अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले.लक्ष्मी नगर परिसरातील गटारी व मोठ्या नाल्याच्या समस्येवरही महापौरांनी लक्ष केंद्रित केले. नागरिकांकडून यापूर्वी तक्रारी करूनही कार्यवाही झालेली नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. नाल्याची तातडीने साफसफाई करून आवश्यक ठिकाणी कल्व्हर्ट टाकण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या.दत्तनगर परिसरात प्रलंबित असलेली गटारींची कामे पूर्ण करण्याबरोबरच ओव्हरफ्लो होणाऱ्या गटारींची तातडीने स्वच्छता करण्याचे निर्देशही महापौरांनी दिले.या दौऱ्यावेळी स्थानिक नगरसेवक इब्राहिम पटेल, अक्षय वंजारी, जरीना शब्बीर शाह, हीनाबी शाकीरखान, माजी नगरसेवक प्रशांत नाईक, आरोग्य विभागप्रमुख समीर बोरोले, अभियंता विजय मराठे यांच्यासह पाणीपुरवठा, विद्युत व आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
महापौरांच्या या पाहणी दौऱ्यामुळे वॉर्ड क्रमांक १७ मधील स्वच्छता, अतिक्रमण आणि मूलभूत सुविधांचे प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.