जळगाव शहरात उपमहापौरांची फटाक्यांच्या दुकानांवर धडक कारवाई; सुरक्षेला रामराम करणाऱ्या बेकायदा दुकानांचे बिंग फुटले!

जळगाव, – गेल्या काही वर्षी जळगाव शहरातील अतिशय दाट लोकवस्तीच्या व वरदळीच्या बाजारपेठेत फटाक्यांच्या दुकानाला लागलेली भीषण आग आणि त्यामुळे झालेली अतोनात हानी अजूनही जळगावकरांच्या स्मरणात आहे. या दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, जळगाव शहर महानगरपालिकेचे उपमहापौर यांनी आज शहरातील अत्यंत वर्दळीच्या भागातील फटाक्यांच्या दुकानांवर अचानक पाहणी केली.
या अचानक केलेल्या कारवाईदरम्यान प्रशासनाला अत्यंत धक्कादायक वास्तव आढळून आले.
तपासणीत समोर आलेले गंभीर प्रकार:
* परवानग्यांचा अभाव: अनेक दुकानदारांकडे फटाके विक्रीसाठी आवश्यक असणारा वैध परवाना (लायसन्स) नसल्याचे निदर्शनास आले.
* नावातघोळ आणि बेकायदा विक्री: अनेक ठिकाणी दुकानांवर ‘हार्डवेअर’ किंवा इतर वस्तूंचे बोर्ड लावण्यात आले होते, परंतु प्रत्यक्षात त्या दुकानांमध्ये बेकायदा फटाक्यांची विक्री केली जात असल्याचे उघड झाले.
* सुरक्षिततेचा बोजवारा: सुरक्षेच्या नावाखाली केवळ दुकानांसमोर २ छोट्या पाण्याच्या बकेट आणि १ ते २ मातीच्या (रेती) बकेट ठेवण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे, त्यातील अनेक अग्निशमन हंडे (बकेट/सिलिंडर) कालबाह्य (एक्सपायर) झालेले होते.
शहराच्या मध्यवर्ती भागात अशा प्रकारे नियमांना तिलांजली देऊन सुरू असलेला हा प्रकार म्हणजे थेट नागरिकांच्या जीवाशी खेळ असल्याचा संताप उपमहापौर व उपस्थित अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
कारवाईदरम्यान उपस्थित प्रमुख अधिकारी व पथक:
या अचानक धडक मोहिमेत उपमहापौरांसोबत मनपाचे खालील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते:
पंकज गोसावी (उपायुक्त) संजय ठाकूर (अतिक्रमण निर्मूलन अधीक्षक)अश्व्जीत घरडे (फायर विभाग प्रमुख), भरत बारी व संपूर्ण अग्निशमन दल / फायर विभाग टीम.
शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपमहापौर व महानगरपालिका प्रशासन आता अधिक कठोर भूमिकेत असून, विनापरवाना आणि सुरक्षेचे नियम पायदळी तुडवणाऱ्या अशा फटाक्यांच्या दुकानांवर कायदेशीर व दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे, असे संकेत या पाहणी मोहिमेदरम्यान देण्यात आले आहेत.