जळगाव जिल्हा

पारोळा रथोत्सवात ६ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या सराईतांना बीडमधून एलसीबीने ठोकल्या बेड्या..

जळगाव : पारोळा शहरातील प्रसिद्ध रथोत्सवादरम्यान झालेल्या सोन्याच्या दागिने चोरीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. रथोत्सवातील प्रचंड गर्दीचा फायदा घेत महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावून पसार झालेल्या आरोपीला जळगाव एलसीबीच्या पथकाने थेट बीड शहरातून अटक केली आहे. गणेश कचरू पवार (वय ४०, रा. अयोध्यानगर, बहिरवाडी, बीड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून तब्बल ६ लाख ११ हजार रुपये किमतीच्या ४७ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या तीन चेन हस्तगत करण्यात आल्या आहेत.

रथोत्सवाच्या गर्दीत साधला डाव

दि. २२ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३० ते ६.३० वाजेच्या सुमारास पारोळा शहरातील लवण गल्ली येथील महेंद्र फोटो स्टुडिओसमोर रथोत्सवाची मोठी गर्दी होती. याच गर्दीचा गैरफायदा घेत ३ ते ४ अज्ञात इसमांनी फिर्यादी यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने जबरीने हिसकावून तोडून चोरी केले होते. या घटनेमुळे रथोत्सवाच्या गर्दीत एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी २५ ऑक्टोबर रोजी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४००/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०४(२), ३०३(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आठ दिवस बीडमध्ये ठाण मांडून आरोपीला पकडले

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार एलसीबीने गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी बीड शहरातील असल्याची माहिती समोर आली.आरोपीचे नाव गणेश कचरू पवार असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एलसीबीचे पथक बीड शहरात रवाना झाले. तब्बल आठ दिवस बीडमध्ये ठाण मांडून, स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीचा शोध घेण्यात आला. अखेर अथक प्रयत्नांनंतर गणेश पवार याला ताब्यात घेण्यात पथकाला यश आले.

सोनारासमक्ष तीन सोन्याच्या चेन जप्त

आरोपीची सखोल चौकशी केली असता त्याने पारोळा येथील चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर दोन पंच आणि सोनार यांच्या समक्ष आरोपीकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.

जप्त केलेल्या मुद्देमाल – पाटली असलेली डिझाइनची सोन्याची चेन – १३ ग्रॅम – १ लाख ६९ हजार रुपये.

– फॅन्सी सोन्याची चेन – १७ ग्रॅम – २ लाख २१ हजार रुपये.

– गोफ असलेली सोन्याची चेन – १७ ग्रॅम – २ लाख २१ हजार रुपये.

अशा एकूण ४७ ग्रॅम वजनाच्या आणि ६ लाख ११ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या तीन चेन हस्तगत करण्यात आल्या आहेत.

एलसीबीच्या पथकाची उल्लेखनीय कामगिरी

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव परिमंडळ, तसेच अमळनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. या पथकात पोउपनिरीक्षक संतोष पवार, पोहेकॉ हरिलाल पाटील, विलेश सोनवणे, राहुल बैसाने, पोलीस कर्मचारी राहुल कोळी, विलास गायकवाड, गोपाळ पाटील, प्रदीप सपकाळे, मिलिंद जाधव, गौरव पाटील आणि चालक रिजवान शेख यांचा समावेश होता.

या गुन्ह्याचा पुढील तपास पारोळा पोलीस ठाण्याचे पोहेकॉ हितेश चिंचोरे करीत आहेत.

रथोत्सवासारख्या मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांतील गर्दीचा फायदा घेऊन दागिने चोरणाऱ्या टोळ्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले असून, बीडपर्यंत जाऊन आरोपीला अटक करत सहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केल्याने जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईचे कौतुक होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे