जळगाव

डम्पिंग ग्राउंडच्या कामाला गती द्या, अन्यथा कचरा येऊ देणार नाही : उपमहापौर मनोज चौधरींचा ठेकेदाराला कडक इशारा..

जळगाव | प्रतिनिधी – शहरातील डम्पिंग ग्राउंडवर सुरू असलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी उपमहापौर मनोज चौधरी आणि स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदारांसह प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा आढावा घेतला. यावेळी काम निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश देतानाच विलंब झाल्यास डम्पिंग ग्राउंडवर शहरातील कचरा येऊ देणार नाही, असा स्पष्ट इशारा दोन्ही पदाधिकाऱ्यांनी दिला.

रॅम्पचे ८० टक्के, तर प्रोसेसिंग प्लांटचे ३० टक्के काम पूर्ण

यापूर्वी ३० ऑक्टोबर रोजी महापौर दीपमाला काळे, आयुक्त आदित्य जीवणे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील आणि नगरसेविका प्रतिभा देशमुख व जयश्री पाटील यांनी या प्रकल्पाची पाहणी केली होती. त्या तुलनेत सध्या कामात सुधारणा होऊन गती आल्याचे पाहणीदरम्यान निदर्शनास आले.सद्यस्थितीत रॅम्पचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले असून प्रोसेसिंग प्लांटचे काम ३० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. रॅम्पचे उर्वरित काम महिनाभरात पूर्ण करण्याचे आश्वासन ठेकेदाराने दिले. तसेच प्रोसेसिंग प्लांटचे फॅब्रिकेशन तयार असून काँक्रिटींग बेस व पिलरचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील तीन ते चार महिन्यांत फॅब्रिकेशनचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली.

मात्र, केवळ तोंडी आश्वासन न देता संपूर्ण काम विहित मुदतीत पूर्ण करण्याबाबत लेखी हमीपत्र मनपा प्रशासनाला सादर करण्याच्या स्पष्ट सूचना उपमहापौर व सभापतींनी रॉयल वेस्टर्नच्या प्रतिनिधींना दिल्या.

‘काम वेळेत पूर्ण करा, अन्यथा कचरा येऊ देणार नाही!’

डम्पिंग ग्राउंडमुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा मुद्दा उपस्थित करत दोन्ही पदाधिकाऱ्यांनी अधिकारी आणि ठेकेदाराला सुनावले. जळगाव शहराचा संपूर्ण कचरा आमच्या प्रभागात आणला जातो. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होऊ देणार नाही. प्रकल्पाचे काम दिलेल्या मुदतीत पूर्ण झाले नाही, तर डम्पिंग ग्राउंडवर कचरा येऊ देणार नाही, असा कडक इशारा त्यांनी दिला.

आगीच्या घटनांमुळे धुराचे साम्राज्य; २४ तास अग्निशमन बंब तैनात करण्याची मागणी

डम्पिंग ग्राउंडवर वारंवार लागणाऱ्या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरत असून नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. धुरामुळे दिवाळीसारखा सणही नागरिकांना मोकळेपणाने साजरा करता आला नाही, तसेच घराबाहेर पडणेही अवघड झाले असल्याची व्यथा पदाधिकाऱ्यांनी मांडली. या धुरामुळे दमा, त्वचाविकार आणि कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढत असल्याची चिंता व्यक्त करत नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली.

आगीच्या घटनांना आळा घालण्यासाठी डम्पिंग ग्राउंडवर २४ तास अग्निशमन दलाचा बंब तैनात ठेवावा, जेणेकरून आग लागल्यास तातडीने नियंत्रण मिळवता येईल आणि धुराचा त्रास कमी करता येईल, अशा स्पष्ट सूचना अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर यांना देण्यात आल्या.डम्पिंग ग्राउंडवरील कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण होणे, आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळवणे आणि परिसरातील नागरिकांना धुराच्या त्रासातून मुक्त करणे, या प्रमुख मागण्यांवर आता मनपा प्रशासन आणि ठेकेदार कोणती ठोस कार्यवाही करतात, याकडे जळगावकरांचे लक्ष लागले आहे.

या पाहणीप्रसंगी अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, आरोग्य उपायुक्त निर्मला गायकवाड, मनपा आरोग्य विभाग प्रमुख समीर बोरोले, प्रकल्प प्रमुख अभियंता योगेश वाणी, रॉयल वेस्टर्नचे राऊत तसेच श्री श्री इन्फ्रास्ट्रक्चरचे साइट इंजिनिअर उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे