जळगाव जिल्ह्यात भाजपातर्फे जनजातीय गौरव सप्ताहाचे आयोजन..

जळगाव | प्रतिनिधी – भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त १५ नोव्हेंबर रोजी साजरा होणाऱ्या जनजातीय गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, संस्कृती, परंपरा तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी भाजपा कार्यालय, जी.एम. फाउंडेशन, जळगाव येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष देवराम होळी तसेच मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली हे उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी सांगितले की, १५ नोव्हेंबर २०२१ पासून देशभरात जनजातीय गौरव दिन साजरा केला जात आहे. आदिवासी समाजातील थोर क्रांतिकारकांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, आदिवासी समाजाची गौरवशाली परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जतन करणे, तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे.
सप्ताहातील कार्यक्रमांचे नियोजन
१३ नोव्हेंबर : जनजागृती कार्यक्रम तसेच अनुसूचित जमाती समाजातील महापुरुषांच्या स्मारक परिसरात दीपोत्सव.
१४ नोव्हेंबर :महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता व परिसराची साफसफाई.
१५ नोव्हेंबर : भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त प्रतिमापूजन, माल्यार्पण, जीवनचरित्रावर माहिती व व्याख्यानांचे आयोजन.
१६ नोव्हेंबर :सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, शोभायात्रा तसेच आदिवासी समाजातील पुरस्कारप्राप्त व्यक्तींचा सन्मान.
१७ नोव्हेंबर :आदिवासी संस्कृती, परंपरा व इतिहासाचे दर्शन घडविणारे सांस्कृतिक कार्यक्रम, शाळांच्या मिरवणुका, लोकनृत्य, लोकगीते, साहित्य चर्चा, विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा, प्रदर्शने व क्रीडा स्पर्धा.
१८ नोव्हेंबर : आदिवासी समाजासाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती, महिला बचत गटांमध्ये जनजागृती तसेच आरोग्य शिबिरांचे आयोजन.
भगवान बिरसा मुंडा यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात दिलेला लढा, त्याग आणि संघर्ष हा प्रेरणादायी इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. जनजातीय गौरव सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी समाजाचा ऐतिहासिक वारसा, सामाजिक योगदान आणि सांस्कृतिक ओळख अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.सप्ताहातील सर्व कार्यक्रमांना व्यापक प्रसिद्धी देऊन जनतेपर्यंत उपक्रमांचा उद्देश पोहोचविण्यासाठी पत्रकार बांधवांनी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार सुरेश भोळे (राजूमामा), भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, डॉ. राधेश्याम चौधरी (पश्चिम) आणि चंद्रकांत बाविस्कर (पूर्व) यांनी केले.
पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन जिल्हा प्रसिद्धीप्रमुख मनोज भंडारकर यांनी केले, तर आभार अनुसूचित जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष हरीलाल कोळी (पूर्व) यांनी मानले.यावेळी जिल्हा प्रभारी एसटी मोर्चा प्रल्हाद सोनवणे, अनुसूचित जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष हरीलाल कोळी (पूर्व), सुभाष पवार (पश्चिम), दीपक कोळी (महानगर), जिल्हा सरचिटणीस भूषण भिल, जिल्हा संयोजक पुंडलिक सपकाळे, बाळासाहेब सैंदाणे यांच्यासह जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.