चोपड्याच्या जंगलात गांजाची शेती : ४ कोटी ६७ लाखांचा गांजा जप्त..
१,८७० किलो गांजाची लागवड : संशयित आरोपी फरार..

चोपडा | प्रतिनिधी –जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात गांजाच्या अवैध लागवडीचा मोठा प्रकार उघडकीस आला असून, चोपडा ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल ४ कोटी ६७ लाख ५० हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. वनक्षेत्रातील कंपार्टमेंट क्रमांक २४० मध्ये ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणामुळे जिल्ह्यातील अमली पदार्थांच्या अवैध लागवडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे., १० नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे ३ वाजता चोपडा तालुक्यातील खा-यापाडा परिसरातील वनक्षेत्रात ही कारवाई करण्यात आली. संशयित आरोपी जुमा आरसी पावरा (रा. खा-यापाडा, ता. चोपडा) याने शेतात गांजासदृश अमली पदार्थांची लागवड केल्याचा आरोप आहे. वनस्पतींचे मूळ, पाने व फांद्या यांसह गांजाचे पीक आढळून आले.

१,८७० किलो ४ कोटी ६७ लाख ५० हजाराचा गांजा जप्त
या कारवाईत सुमारे १ हजार ८७० किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आल्याची नोंद आहे. त्याची किंमत ४ कोटी ६७ लाख ५० हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. गांजाच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर व ट्रॉलीदेखील जप्त करण्यात आली आहे. याशिवाय गांजाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.
आरोपी फरार :एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल..
या प्रकरणातील संशयित आरोपी जुमा आरसी पावरा हा पोलिसांच्या हाती लागलेला नसून फरार असल्याची नोंद आहे. चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संजय सोनवणे करीत आहेत. गांजाची लागवड कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आली, या अवैध व्यवसायामागे आणखी कोणाचे जाळे कार्यरत आहे, तसेच अमली पदार्थांची विक्री कुठे केली जाणार होती, याचा तपास होणे महत्त्वाचे ठरणार आहे.
चोपड्याच्या वनक्षेत्रात एवढ्या मोठ्या प्रमाणावर गांजाची लागवड होत असताना संबंधित यंत्रणांच्या नजरेत हा प्रकार कसा आला नाही, हा प्रश्नही उपस्थित होत आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासातून अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायाचे मोठे रॅकेट उघडकीस येते का, याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.