शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे. CEO मिनल करनवाल यांचे शेतकऱ्यांना आवाहन..
जळगाव /प्रतिनिधी – शेतकऱ्यांनी शेती व्यवसाय करताना धोका पत्करण्याची तयारी ठेऊन शेतीत नवनवीन प्रयोग केले पाहिजेत.रासायनिक खतांच्या अति वापरामुळे जमिनीचा पोत बिघडत चालला आहे.त्या सोबतच मनुष्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत.हे टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी केले.
दि.४ एप्रिल रोजी जिल्हा परिषदेच्या साने गुरुजी सभागृहात आयोजित पानी फाऊंडेशन च्या फार्मर कप बक्षीस वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर एस लोखंडे,एग्रोवर्ड चे शैलेंद्र चव्हाण,यांचे सह गट शेती करणाऱ्या महिलांचे समूह उपस्थित होते.यावेळी बोलताना श्रीमती करनवाल म्हणाल्या की,पानी फाऊंडेशन शेतकऱ्यांसाठी अत्यंत निस्वार्थी भावनेने काम करत आहे.शेतीत धोका खूप मोठा असतो.निसर्गाच्या चक्रावर शेती अवलंबून असते. तरी देखील शेतकऱ्यांनी धोका पत्करण्याची तयारी ठेऊन शेतीत नवनवे प्रयोग केले पाहिजेत.जगात सर्व गोष्टींची साखळी आहे.सर्व गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत.मनुष्य हा फक्त स्वतःचा विचार करतो मात्र आपल्या काही गोष्टींचा इतर घटकांवर काय परिणाम होतो याचा विचार केला पाहिजे.पाणी ही संपणारी गोष्ट आहे.त्यामुळे पाण्याचा जपून वापर होण्यासोबतच पाणी साठविणे जमिनीत रुजवणे तितकेच महत्त्वाचे आहे.हीच बाब लक्षात घेऊन जळगाव जिल्हा परिषदेने मिशन संजीविनी हे अभियान सुरू केले आहे.आगामी काळात पाणी आडवा पाणी जिरवा सारखे उपक्रम राबविण्यात येणार असून यात जे शेतकरी,समूह पुढाकार घेतील त्यांच्यासाठी वॉटर कप च्या धर्तीवर प्रोत्साहन पर बक्षीस योजना जाहीर करण्यात येणार आहे.भविष्यात शुद्ध पाणी आणि शुद्ध हवा या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत.त्या करिता पाण्याचा थेंब अन थेंब वाचविणे आणि साठविणे महत्वाचे आहे.असेही श्रीमती करनवाल म्हणाल्या.यावेळी धरती माता शेतकरी गट,रोटवद शेतकरी गट,शंभू महिला शेतकरी गट,गायत्री महिला शेतकरी गट यांना गट शेतीत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.