जळगावात “स्पा” सेंटरवर LCB चा छापा..
स्पा सेंटरच्या नावाखाली सर्रास सुरू होता देहविक्रीचा गोरखधंदा..

जळगाव : शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉपजवळ असलेल्या नयनतारा मार्केट मॉल येथे स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीवर एलसीबीसह जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने कारवाई केली आहे. एकूण ४ महिलांची सुटका करण्यात आली असून एकाला अटक करण्यात आली आहे. तर त्याच्यासह हरियाणाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि.१८ एप्रिल २०२५ रोजी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड (स्थानीक गुन्हे शाखा, जळगाव) यांना गोपनीय माहिती मिळाली की, जळगाव शहरातील गोविदा रिक्षा स्टॉप जवळील नयनतारा आर्केड मॉलच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या ‘०३ डे स्पा सेंटर’ शॉप नं. ४०८ या ठिकाणी स्पा मसाजच्या नावाखाली गि-हाईकांना शरीरसंबंधासाठी महिलांकडून देहविक्रीचा व्यवसाय केला जात आहे.
सदर माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली बनावट ग्राहक पाठवण्यात आला. त्यावेळी स्पा सेंटरचा मॅनेजर राजु माधुजी जाट (रा. कलोधिया, ता. पिंपरी, जि. भिलवाडा, राजस्थान) याने स्पा मसाज व्यतिरिक्त “इतर सेवा” देण्याचे आमिष दिले. त्यानंतर स्पा सेंटरवर छापा टाकून ०४ महिलांची सुटका करण्यात आली. या महिलांकडून स्पा सेंटरच्या आड देहविक्रीचा व्यवसाय करण्यात येत होता.या गुन्ह्यात मॅनेजर राजु जाट यास अटक करण्यात आली असून, या व्यवसायाला प्रोत्साहन देणारा मालक विक्रम राजपाल (वय २०, रा. चत्तरगढ पत्ती, जि. सिरसा, हरियाणा) याच्याविरुद्ध देखील पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व पिडीत महिलांना “आशादीप निराधार महिला वसतीगृह, जळगाव” येथे दाखल करण्यात आले आहे.
सदर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पो.नि. अनिल भवारी, यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने केली.
जळगाव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या अशा अनैतिक धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले असून, अशा प्रकारच्या कारवाया भविष्यातही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.