सुनेत्रा पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ..
सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री.

उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास खात्यांची जबाबदारी.
जळगाव I राज्यातील राजकारणात ऐतिहासिक घडामोड घडली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या राजकीय वारशाची धुरा अखेर सुनेत्रा पवार यांनी स्वीकारली आहे. आज मुंबईतील लोकभवनात पार पडलेल्या शपथविधीनंतर त्या अधिकृतपणे राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या असून, त्यांना खातेवाटपही जाहीर करण्यात आले आहे.
राज्याच्या ११ व्या उपमुख्यमंत्री ठरलेल्या सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण तसेच अल्पसंख्याक विकास ही तीन महत्त्वाची खाती सोपवण्यात आली आहेत. सामाजिक कार्याचा मोठा अनुभव असलेल्या सुनेत्रा पवार यांच्याकडे ही खाती देण्यात आल्याने सरकारचा सामाजिक व युवकाभिमुख दृष्टिकोन स्पष्ट झाल्याची चर्चा आहे.दरम्यान, दिवंगत अजित पवार यांच्याकडे असलेले नियोजन आणि वित्त हे महत्त्वाचे खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवले आहे. त्यामुळे राज्याच्या आर्थिक धोरणांवर थेट मुख्यमंत्र्यांचे नियंत्रण राहणार आहे.
लोकभवनातील दरबार हॉलमध्ये मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने शपथविधी पार पडला. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
‘महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री’ म्हणून सुनेत्रा पवार यांचे नाव इतिहासात नोंदले गेले.