मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा २ चे बक्षीस वितरण..
जळगाव/प्रतिनिधी – जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची परिस्थिती सुधारणे अत्यंत गरजेचे आहे.शासन यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत आहे.असे असतानाही शाळांचा दर्जा आणि गुणवत्तेत वाढ होत नसल्याने ही चिंतेची बाब असली तरी जळगाव जिल्ह्यात मात्र प्राथमिक शाळांचा दर्जा अत्यंत चांगला आहे.या मुळेच मुख्यमंत्री माझी शाळा सारख्या चांगल्या योजनेत जळगाव जिल्ह्याने मोठ्या प्रमाणात बक्षिसे मिळवली आहेत.त्यामुळे मी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शिक्षकांचे कौतुक करतो असे प्रतिपादन राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री ना.संजय सावकारे यांनी केले.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा २ चे बक्षीस वितरण शुक्रवार दि.४ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन समितीच्या सभागृहात पार पडले.या वेळी ना.सावकारे बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल,आमदार किशोर पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, माध्यमिक शिक्षण अधिकारी कल्पना चव्हाण,यांचेसह जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांनी प्रास्ताविकातून सांगितले की,जिल्हा परिषदेच्या शाळांकडे चुकीच्या नजरेने बघितले जाते.मात्र या शाळांचे चित्र बदलविण्यासाठी सर्वच प्रयत्न करीत आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये लोकसहभाग वाढावा या शाळांमधून शिक्षण घेऊन मोठे झालेल्या विद्यार्थ्यांना शाळेसाठी काहीतरी करता यावे या उद्देशाने जिल्हा परिषद शाळा माजी विद्यार्थी संघ याचे उद्घाटन करण्याची घोषणा या वेळी करनवाल यांनी केली.या माजी विद्यार्थी संघासाठी एक पोर्टल विकसित करण्यात येत असून या माध्यमातून माजी विद्यार्थी शाळांना सर्वोतोपरी मदत करू शकतात असेही त्यांनी यावेळी सांगितले.या वेळी प्रातिनिधिक स्वरूपात अजबसिंग पाटील,आर टी निकम,प्रमोद पाटील,प्रदीप भदाणे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकाविले जि.प.शाळा,होळ ता.पाचोरा,द्वितीय जि प शाळा कढोली ता.एरोंडोल,तृतीय जि.प.शाळा सावखेडे ता.पारोळा,उर्वरित इतर व्यवस्थापनाच्या शाळा मधे प्रथम कै.या.द.पाटील शाळा भडगाव,द्वितीय सारजाई कुडे शाळा,धरणगांव,तृतीय क्रमांक जनता हायस्कूल नेरी यांना प्रमाणपत्र,स्मृती चिन्ह व धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले.