यावल वन विभागाची वन्यजीव संरक्षणासाठी कृत्रिम पाणवठयांची उभारणी..
यावल – उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेमुळे जंगलातील नैसर्गिक जलस्त्रोत आटत्त चालले आहेत, त्यामुळे वन्यजीवांना पाण्यासाठी दुरवर भटकंती करावी लागत आहे या समस्येचे निराकरण करण्यासाठी यावल वन विभागाचे जंगलातील विविध ठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार करण्याचा महत्वपुर्ण उपक्रम हाती घेतला आहे.
यावल वन्यजीव अभयारण्य जैवविविधतेने समृध्द असून तेथे चित्तळ, निलगाय, अस्वल, बिबटया, वाघ यांसारखे अनेक वन्यजीव आढळतात. उन्हाळ्यात पाण्याच्या कमतरतेमुळे हे प्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीच्या जवळ येण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष होऊ शकतो. या पार्श्वभुमीवर कृत्रिम पाणवठयांची उभारणी ही वन्यजीवांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात आवश्यक पाणी उपलब्ध करुन देण्यास मदत करेल आणि मानव वन्यजीव संघर्ष टाळता येईल.
कृत्रिम पाणवठे तयार करतांना त्यांच्या वैज्ञानिक बांधणीवर विशेष लक्ष दिले जात आहे. या पाणवठयांच्या आजु बाजुला दगडी उतार तयार करुन प्राण्यांना सहजपणे पाणी पिण्यांस मदत केली जाते, तसेच पाण्यात पडण्याचे अपघात टाळता येतात. या पाणवठयांची नियमित देखभाल आणि पाण्याची पुर्तता करण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी सातत्याने कार्यरत आहेत. या उपक्रमामुळे वन्यजीवांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे पाणी मिळेल, ज्यामुळे त्यांचे आरोग्य सुधारेल आणि प्रजनन क्षमतेत वाढ होईल. तसेच पर्यटक आणि वन्यजीव प्रेमींसाठीही हे पाणवते वन्यजीव निरीक्षणासाठी उपयुक्त ठरतील, ज्यामुळे पर्यावरण पर्यटनाला चालना मिळेल.यावल वनविभाग वन्यजीव संरक्षणासाठी कटिबध्द आहे. कृत्रिम पाणवठयांच्या उभारणीसारख्या उपक्रमांव्दारे वन्यजीवांच्या दीर्घकालीन संरक्षणासाठी प्रयत्नशील आहे. वन्यजीव आणि मानव यांच्यातील समतोल साधण्यासाठी आणि पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी अशा उपाय योजना अत्यंत आवश्यक आहेत.
सदर कृत्रिम पाणवठे हे उप वनसंरक्षक, यावल वनविभाग जळगांव जमीर शेख, यांचे मार्गदर्शनाखाली तयार करण्यांत आले आहेत.