आ.अमोल जावळे यांची गारपीटग्रस्त शेतीची पाहणी; तातडीने पंचनाम्याचे आदेश..
रावेर- तालुक्यात दिनांक 12 एप्रिल रोजी संध्याकाळच्या सुमारास आलेल्या अवकाळी पावसासह गारपीट व वादळी वाऱ्यामुळे रावेर तालुक्यातील पुनखेडा, पातोंडी, अंजदा, उटखेडा, भातखेडा, मुंजलवाडी, खिरवड , नेहते, दोधे, रावेर, गौरखेडा, विवरे, वडगाव, लोहारा आदी भागांतील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटात शेतकऱ्यांवर आर्थिक झळ बसली असून, अनेकांचे पिके अक्षरशः जमीनदोस्त झाली आहेत.
या पार्श्वभूमीवर आज आमदार अमोल जावळे यांनी संबंधित नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. स्थानिक पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली.
आ. जावळे यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी आपण स्वतः प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन दिले. त्यांनी शेतकऱ्यांना धीर देत शासनाच्या माध्यमातून योग्य ती मदत मिळवून देण्याचेही वचन दिले.या पाहणी दौऱ्यात तहसीलदार बंडू कापसे, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत वाळके, भाजपा पदाधिकारी सुरेश धनके, पद्माकर महाजन, हरलाल कोळी, रवींद्र पाटील, चेतन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.