मुख्यमंत्री ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत गुणवत्ताधारित शाळांचा गौरव..
जळगाव (प्रतिनिधी) : हनुमान जयंतीसारख्या पवित्र दिवशी शिक्षकांचा गौरव होणं ही अत्यंत सकारात्मक बाब असल्याचे प्रतिपादन जलसंपदा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. “शिक्षण म्हणजेच समाज परिवर्तनाची खरी गदा आहे. ही गदा जर प्रत्येक विद्यार्थ्याच्या हाती दिली, तर तो स्वतःच्या आयुष्याचा ‘राम’ बनू शकतो,” असे उद्गार त्यांनी काढले.
मुख्यमंत्री ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ या राज्यस्तरीय उपक्रमामुळे समाजाचा शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असून अनेक जिल्हा परिषद शाळा आधुनिक शिक्षण केंद्रात रूपांतरित होत असल्याचे त्यांनी नमूद केले. फक्त शाळा स्वच्छ आणि सुंदर असणे पुरेसे नाही, तर त्या गुणवत्तापूर्णही असाव्यात. जिल्ह्यातील प्रत्येक शाळेने पटसंख्या वाढवून गुणवत्ता उन्नतीचा संकल्प करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.पालकमंत्री पाटील यांनी जळगाव ग्रामीणमधील पटसंख्या वाढविणाऱ्या जिल्हा परिषद शाळांना १० लाखांचा आमदार निधी देण्याची घोषणा यावेळी केली. या कार्यक्रमाला आमदार राजूमामा भोळे यांचीही उपस्थिती लाभली होती.
गुणवत्ताधारित शाळांचा सन्मान
‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत तालुका व जिल्हा स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शाळांचा सत्कार नियोजन भवन, जळगाव येथे हनुमान जयंतीच्या निमित्ताने उत्साहात पार पडला. विद्यार्थिनींनी सादर केलेल्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.जळगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील पिलखेडा, तरसोद, वितानेर तसेच माध्यमिक स्तरावरील अनुभूती इंग्लिश स्कूल, शानबाग माध्यमिक विद्यालय (सावखेडा), सार्वजनिक विद्यालय (आसोदा), माध्यमिक विद्यालय (करंज) या शाळांच्या मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंदांचा सत्कार स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला.कार्यक्रमात डायटचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांनी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळांचा गौरव करताना, इतर शाळांनी त्यांचे अनुकरण करावे, असे सांगितले.प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, इ. २ री ते ५ वीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी ५ मार्च २०२५ रोजी राज्य शासनाने निर्णय निर्गमित केला असून त्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.“हा शासन निर्णय म्हणजे शिक्षण विभागाचा मूलमंत्र आहे. त्याचे सर्व शिक्षकांनी काळजीपूर्वक वाचन करावे व पालन केल्यास शाळा १०० टक्के गुणवत्ता युक्त होतील,” असेही त्यांनी स्पष्ट केले.निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमात शिक्षकांना त्यांच्या कार्याचे समाजापुढे सादरीकरण करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून चावडी वाचनाद्वारे गुणवत्ता सुधारत असल्याचेही त्यांनी नमूद केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभारी केंद्रप्रमुख सुशील पवार यांनी केले. प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी सरला पाटील यांनी केले,
यावेळी आमदार राजूमामा भोळे, डॉ. अनिल झोपे, विकास पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी जितेंद्र चिंचोले, खालील शेख यांच्यासह जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.