इन्स्टाग्रामवरील प्रेमाचा रक्त रंजित अंत :विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या..

चोपडा (प्रतिनिधी): तालुक्यातील अकुलखेडा गावात एक खळबळजनक घटना घडली आहे. प्रेमप्रकरणातून उद्भवलेल्या वादातून एका तरुणाने आपल्या विवाहित प्रेयसीची गोळ्या झाडून हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

अकुलखेडा येथील रहिवासी जगदीश पाटील यांच्या पत्नी अनिता पाटील आणि शिरपूर येथील देवानंद धनगर या तरुणाची गेल्या काही महिन्यापूर्वी इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर पुढे प्रेमप्रकरणात झाले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अनिता ही देवानंदला टाळत होती. याच रागातून देवानंदने टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
काल सकाळी ११ वाजेच्या सुमारास अनिता यांची मुलगी शाळेतून घरी परतली. घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे पाहून तिने दरवाजा उघडला असता, समोरचे दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिची आई अनिता आणि एक अनोळखी तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. मुलीने तात्काळ वडिलांना फोन करून घरी बोलावले. जगदीश पाटील यांनी घरी धाव घेत घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांना पाचारण केले.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार अनिता आणि देवानंद यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. अनिताने संवाद तोडल्यामुळे संतप्त झालेल्या देवानंदने तिच्यावर बंदुकीने गोळ्या झाडून तिची हत्या केली. त्यानंतर त्याने त्याच शस्त्राने स्वतःलाही संपवून घेतले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, या घटनेत वापरलेले शस्त्र देवानंदकडे कुठून आले, याचा तपास आता पोलीस करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून अकुलखेडा गावात भीतीचे व शोकाकुल वातावरण आहे.