“केवायसी साठी १०० रुपयांची लाच : गृह उपयोगी संच वाटप केंद्रावरील महिला कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल! ACB ची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) — महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या गृह उपयोगी संच वाटप योजनेतही भ्रष्टाचाराचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. केवायसी प्रक्रियेच्या मोबदल्यात लाभार्थ्याकडून १०० रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी महिला कर्मचारी आसमा परवीन शेख इरफान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे जळगाव येथील रहिवासी असून त्यांनी दि. ०९ एप्रिल २०२६ रोजी गृह उपयोगी संच मिळविण्यासाठी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यानंतर दि. १५ एप्रिल २०२६ रोजी चिंचोली (ता. जि. जळगाव) येथे संच ताब्यात घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे पत्र त्यांना प्राप्त झाले होते. त्यानुसार तक्रारदार संच वाटप केंद्रावर गेले असता, तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्यांना महिला कर्मचारी आसमा परवीन शेख इरफान यांची भेट घेण्यास सांगितले. भेटीदरम्यान संबंधित महिलेने “तुमची केवायसी करावी लागेल, त्यासाठी १०० रुपये द्यावे लागतील,” अशी मागणी करत थेट लाच मागितली. दरम्यान तक्रारदाराने तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे १५ एप्रिल रोजी लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. पडताळणी दरम्यान आसमा परवीन शेख इरफान यांनी पंचासमक्ष १०० रुपयांची लाच स्वीकारण्यास संमती दर्शविली.
यानंतर सापळा रचून तक्रारदाराकडून १०० रुपयांची लाच रक्कम स्वीकारताना आसमा परवीन शेख इरफान यांना रंगेहाथ पकडण्यात आली. विशेष म्हणजे,आसमा परवीन शेख इरफान यांनी ही रक्कम आपल्या टेबलाखाली ठेवलेल्या पत्रीपेटीत लपवून ठेवण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले.
या प्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन येथे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई एसीबी चे पोलीस उप अधिक्षक, योगेश ठाकुर, रेश्मा चंद्रकांत अवतारे, पोलीस निरीक्षक, , कॅम्प-ला.प्र.वि.,नंदुरबार,श्रेपोउपनिरी. सुरेश पाटील, पोहेकों/बाळु मराठे, पोकों/राकेश दुसाने, पोकों/प्रदिप पोळ, यांनी केली