लक्झरी मधून 25 लाखाची बॅग लंपास करणारे चोरटे जेरबंद : LCB ची कारवाई..

जळगाव, दि. १७ जुलै : कोल्हापूर येथे चांदी खरेदीसाठी नेण्यात येणारे २५ लाख रुपये रोख लक्झरी बसमधून चोरी झाल्याच्या गाजलेल्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) यशस्वी छडा लावत चार आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीची संपूर्ण २५ लाख रुपयांची रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली ५ लाख रुपये किमतीची मारुती डिझायर कार जप्त करण्यात आली असून, एकूण ३० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

११ जुलै २०२६ रोजी नितीन पुरुषोत्तम वाणी (रा. पारोळा) हे सराफ व्यावसायिक प्रफुल्ल सुराणा यांच्या वतीने कोल्हापूर येथे चांदी खरेदीसाठी २५ लाख रुपये रोख घेऊन हेरे कृष्णा ट्रॅव्हल्सने प्रवास करत होते. रात्री फर्दापूर येथील एका हॉटेलवर बस जेवणासाठी थांबली असता त्यांनी पैशांची बॅग बसमध्येच ठेवली होती. जेवण करून परत आल्यावर बॅग गायब झाल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेला सराईत गुन्हेगार सोनू उर्फ राम भगवान सारवाण याने हा गुन्हा केल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत आणखी तीन साथीदारांची नावे सांगितली. त्यानुसार पोलिसांनी शेख रहेमान शेख निसार, सचिन उर्फ मंगेश झांबरे आणि दशरथ सुरेश चौधरी यांना अटक केली.चौकशीत शेख रहेमान याने गुन्हा करण्यासाठी स्वतःची मारुती डिझायर (MH-47-C-7877) उपलब्ध करून दिल्याचेही निष्पन्न झाले.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींना पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, या गुन्ह्याचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.