उमरटीत पोलिसांचे अंतरराज्यीय ‘ऑपरेशन कॉम्बिंग’ : बेकायदेशीर शस्त्रसाठ्यावर मोठी कारवाई..
जळगाव, नाशिक व धुळे पोलिसांचे संयुक्त ऑपरेशन : देशी कट्टे, जिवंत काडतुसे, शस्त्रनिर्मितीचा कच्चा माल जप्त

जळगाव – जिल्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेणे तसेच बेकायदेशीर शस्त्रनिर्मिती व तस्करीला आळा घालण्यासाठी जळगाव, नाशिक आणि धुळे पोलिसांनी मध्य प्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील पार उमरटी (ता. वरला) येथे मोठी अंतरराज्यीय ‘ऑपरेशन कॉम्बिंग’ मोहीम राबवली. पहाटेच्या सुमारास करण्यात आलेल्या या धडक कारवाईत १२ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, दोन देशी कट्टे, चार जिवंत काडतुसे, ३२ संशयित मोटारसायकली तसेच देशी कट्टे तयार करण्यासाठी वापरला जाणारा मोठ्या प्रमाणातील कच्चा माल व साचे जप्त करण्यात आले आहेत.ही मोहीम जळगाव जिल्ह्यातील विविध गंभीर गुन्ह्यांतील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी आखण्यात आली होती. चोपडा शहर, चोपडा ग्रामीण तसेच नाशिक ग्रामीणच्या पवारवाडी पोलीस ठाण्यात दाखल शस्त्र अधिनियमाशी संबंधित गुन्ह्यांच्या अनुषंगाने ही संयुक्त कारवाई करण्यात आली.

या विशेष मोहिमेचे नेतृत्व अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी केले. त्यांच्यासह सहाय्यक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल, विविध उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी तसेच जळगाव, नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक या मोहिमेत सहभागी झाले होते.
या कारवाईसाठी जळगाव, नाशिक आणि धुळे जिल्ह्यांतील ४०० हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि २० शासकीय वाहनांचा ताफा सहभागी झाला होता. मध्यरात्री १ वाजता पथक रवाना झाले असून पहाटे ४ ते सकाळी ८ या वेळेत पार उमरटी परिसरात सघन शोधमोहीम राबविण्यात आली. कारवाईदरम्यान ४५ संशयित घरांची झडती घेण्यात आली, तर २० संशयितांची सखोल चौकशी करण्यात आली. याशिवाय २७ फरार व संशयित आरोपींच्या घरांचे जिओ-टॅगिंग करून त्यांची माहिती आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नोंदविण्यात आली.
दरम्यान, चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन संशयितांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून दोन देशी कट्टे आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. तसेच महाराष्ट्र पासिंगच्या ३२ संशयित मोटारसायकली आणि देशी कट्टे तयार करण्यासाठी लागणारा मोठ्या प्रमाणातील कच्चा माल, साचे व इतर साहित्यही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या अंतरराज्यीय कारवाईमुळे बेकायदेशीर शस्त्रनिर्मिती आणि तस्करी करणाऱ्या रॅकेटविरोधात मोठी कारवाई झाल्याचे मानले जात असून, पुढील तपास संबंधित पोलीस पथकांकडून सुरू आहे.