चीज अॅनालॉग वापरावर अन्न व्यवसायिकांना अन्न व औषध प्रशासन विभागाचा इशारा..
ग्राहकांची दिशाभूल टाळण्यासाठी स्पष्ट माहिती देणे बंधनकारक..

जळगाव — अन्नपदार्थांच्या गुणवत्तबाबत ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी अन्न व औषध प्रशासनाने राज्यातील रेस्टॉरंट, हॉटेल, केटरर्स तसेच फास्ट फूड विक्रेत्यांना “चीज अॅनालॉग” वापराबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. अन्नपदार्थ तयार करताना “चीज अॅनालॉग”चा वापर केल्यास त्याची स्पष्ट माहिती ग्राहकांना देणे बंधनकारक असून नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ नुसार ग्राहकांना सुरक्षित, सकस व योग्य माहिती असलेले अन्नपदार्थ उपलब्ध करून देणे प्रत्येक अन्न व्यवसायिकाची जबाबदारी आहे. मात्र काही ठिकाणी पनीर किंवा चीजऐवजी “चीज अॅनालॉग” वापरून पदार्थ तयार केले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तसेच काही विक्रेते “चीज अॅनालॉग”ची विक्री थेट “चीज” किंवा “पनीर” या नावाने करत असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे ग्राहकांची दिशाभूल होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
अन्न सुरक्षा व मानके नियमांनुसार “पनीर” हा केवळ दुधापासून बनवला जाणारा पदार्थ आहे, तर “चीज अॅनालॉग” हा वनस्पतीजन्य तेल किंवा इतर घटक वापरून तयार केला जातो. त्यामुळे दोन्ही पदार्थांमध्ये मूलभूत फरक असून विक्रेत्यांनी ग्राहकांना त्याबाबत स्पष्ट माहिती देणे आवश्यक आहे.
यासाठी मेनूकार्ड, इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड तसेच बिलावर “चीज अॅनालॉग” असा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक करण्यात आले आहे. तसे न केल्यास संबंधित अन्न व्यवसायिकांवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत दंडात्मक कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अन्न व्यवसायिकांनी परवाना अर्जातील मोबाईल क्रमांक व ई-मेल माहिती अद्ययावत ठेवावी, तसेच ग्राहकांनी अन्नपदार्थ खरेदी करताना लेबल तपासावे आणि बिल घेण्याची सवय ठेवावी, असे आवाहनही अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.
ही कारवाई ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी असून अन्नपदार्थांबाबत पारदर्शकता राखणे सर्व विक्रेत्यांसाठी अनिवार्य असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
ग्राहकांची दिशाभूल झाल्यास १८००-२२२-३६५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन अन्न सुरक्षा आयुक्त यांनी केले आहे.