जळगाव

5 लाखाची लाच : सार्वजनिक बांधकाम विभागाचा शाखा अभियंता ACB च्या जाळ्यात..

जळगाव – सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव येथील शाखा अभियंता वर्ग-२ योगेश अभिमन्यु अहिरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. उर्वरित बिल मंजूर करून देण्यासाठी तब्बल १८ लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा गंभीर आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सब-कॉन्ट्रक्टर असून त्यांनी जळगाव शहरातील वार्ड क्रमांक १४, विनोबानगर परिसरात सिमेंट काँक्रीट रस्त्याचे सुमारे ८० लाख ३९ हजार ७४२ रुपयांचे काम सन २०२४ मध्ये पूर्ण केले होते. काम पूर्ण झाल्यानंतर निधीअभावी त्यांचे संपूर्ण बिल अदा झाले नव्हते. त्यापैकी अंदाजे ४२ लाख रुपये ऑक्टोबर २०२५ मध्ये मिळाले होते, तर सुमारे ३८ लाख ४९ हजार ७४२ रुपये प्रलंबित होते.

उर्वरित बिल मंजूर करण्यासाठी तक्रारदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता योगेश अहिरे यांची भेट घेतली असता, त्यांनी यापूर्वी मंजूर करून दिलेल्या बिलाच्या मोबदल्यात आणि उर्वरित बिल मंजुरीसाठी १८ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तडजोडीनंतर ही रक्कम १५ लाख रुपयांवर ठरली. त्यातील ७.५० लाख रुपये स्वतःसाठी आणि ७.५० लाख रुपये वरिष्ठ अधिकाऱ्यासाठी असल्याचेही पडताळणीत समोर आले.तक्रारदारांनी याबाबत ५ मे २०२६ रोजी ACB जळगाव विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानंतर पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये लाच मागणीची खात्री झाल्यानंतर ACB ने सापळा रचला.

दि. ९ मे २०२६ रोजी करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान योगेश अहिरे यांनी पहिला हप्ता म्हणून ५ लाख रुपये स्वीकारण्यास सहमती दर्शवली. तक्रारदारांना योगेश अहिरे यांनी स्वतःच्या निळ्या रंगाच्या बलेनो कार (एमएच १९ सीव्ही २६१९) मधील समोरील सीटखाली रक्कम ठेवण्यास सांगितले. तक्रारदारांनी रक्कम ठेवल्यानंतर ACB च्या पथकाने योगेश अहिरे यांना रंगेहाथ पकडले.

याचवेळी, एकूण बिलाच्या ६ टक्के रक्कम एका नगरसेविकेच्या मुलाला देण्यास सांगून लाच मागणीस प्रोत्साहन दिल्याचाही आरोप समोर आला आहे. या प्रकरणी योगेश अहिरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास ACB करत आहे.

सदर कारवाई – जळगाव एसीबीचे पोलीस उपअधिक्षक,योगेश ठाकुर, पोलीस निरीक्षक, रेश्मा अवतारे ला.प्र.वि.,नंदुरबार,कॅम्प,पोलीस निरीक्षक, हेमंत नागरे,श्रेणी पोउनि /सुरेश पाटील, मपोहेका/संगीता पवार, पोहेका/बाळु मराठे, पोकॉ/प्रदिप पोळ, पोकॉ/भुषण पाटील, यांनी केली.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे