
जळगाव – जळगाव पोलिसांनी अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांविरोधात सुरू केलेल्या “विशेष शोध मोहिमे” अंतर्गत शनिपेठ पोलिसांनी मोठी कारवाई करत एका बांगलादेशी महिलेला ताब्यात घेतले आहे. या महिलेला आश्रय देणाऱ्या व्यक्तीवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भोई गल्ली, जोशी पेठ परिसरात एक परदेशी महिला कोणतीही वैध कागदपत्रे नसताना राहत असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत शनिपेठ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार दि. १० मे २०२६ रोजी पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला.
या कारवाईदरम्यान कोणीका राणी शामलचंद्र राय (वय २०, रा. बांगलादेश) ही महिला आढळून आली. चौकशीअंती तिच्याकडे कोणतेही वैध पासपोर्ट किंवा व्हिसा नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच तिने घुसखोरीच्या मार्गाने भारतीय सरहद्दीत प्रवेश करून जळगावात अनधिकृत वास्तव्य केल्याचे निष्पन्न झाले.या प्रकरणी पोलिसांनी बांगलादेशी महिला कोणीका राणी शामलचंद्र राय हिच्यासह चिन्मय जगन्नाथ वाला (रा. जळगाव, मूळ रा. पश्चिम बंगाल) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संबंधित महिला बांगलादेशी नागरिक असल्याची माहिती असूनही तिला पोलिसांपासून लपवून ठेवत आश्रय दिल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
सदर प्रकरणात इमिग्रेशन आणि परदेशी कायदा २०२५ अंतर्गत कलम २१, ०८ आणि २४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मन्सूरी हे करत आहेत.
दरम्यान, जळगाव पोलिसांकडून शहर आणि जिल्ह्यात अवैध वास्तव्य, बनावट कागदपत्रे तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील बाबींवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांनी कोणतीही संशयास्पद माहिती तात्काळ पोलिसांना कळवून सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.