शहर पोलीस स्टेशन पासून काही अंतरावरील लॉजवर LCB ची धाड : वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश..
शहर पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावरील लॉजवर सर्रास सुरु होता वेश्या व्यवसाय..

जळगाव – शहर पोलीस स्टेशनच्या जवळच टॉवर चौक परिसरातील एका लॉजवर स्थानिक गुन्हे शाखा आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने धडक कारवाई करत सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला. विशेष म्हणजे शहर पोलीस स्टेशनच्या अगदी जवळच हा गैरप्रकार सर्रास सुरू असल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
दिनांक ९ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गुप्त माहिती मिळाली होती की, टॉवर चौकातील एका नामांकित लॉजमध्ये महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून बेकायदेशीर वेश्याव्यवसाय करवून घेतला जात आहे. या माहितीची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि AHTU च्या पथकाने अत्यंत गोपनीय पद्धतीने सापळा रचला. एका डमी ग्राहकाला संबंधित लॉजमध्ये पाठवण्यात आले. पैशांची बोलणी पूर्ण झाल्यानंतर डमी ग्राहकाने पोलिसांना ठरलेला इशारा दिला. त्यानंतर दबा धरून बसलेल्या पोलिसांनी लॉजवर अचानक छापा टाकला. छाप्यामध्ये संबंधित ठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे स्पष्ट झाले.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपी राजू मोतीराम जोशी याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात PITA Act कलम ३, ४ आणि ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच घटनास्थळावरून रोख रक्कम व अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.या सेक्स रॅकेटची व्याप्ती किती मोठी आहे, यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच शहरात अशा प्रकारचे आणखी अड्डे सुरू आहेत का, याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.दरम्यान, या कारवाईत अडकलेल्या पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून त्यांचे समुपदेशन करून त्यांना सुधारगृहात पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली शहरात कुठेही असे गैरप्रकार सुरू असल्यास नागरिकांनी निर्भयपणे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा आणि AHTU च्या पथकाने केली.