निपुण भारत अभियानाचा जि. प. CEO करिश्मा नायर यांनी घेतला व्हिडिओ कॉलद्वारे आढावा : विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे केले कौतुक..

जळगाव | प्रतिनिधी – निपुण भारत अभियानांतर्गत जिल्हा परिषद शाळांमध्ये सुरू असलेल्या अध्यापनाची गुणवत्ता आणि तासिकांची प्रभावी अंमलबजावणी तपासण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी सोमवारी (दि. १३ जुलै) जिल्हा परिषद शाळा, डोंगर कठोरे येथील वर्गाशी व्हिडिओ कॉलद्वारे थेट संवाद साधत विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रगतीचा आढावा घेतला.

यावेळी वर्गशिक्षक राहुल वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली शिकणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांनी प्रत्येक विद्यार्थी कोणत्या अध्ययन स्तरावर आहे, याची माहिती घेतली. तसेच संबंधित स्तरानुसार विविध प्रश्न विचारून विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेची पडताळणी केली. कृती आराखड्यानुसार त्या दिवशी कोणते अध्यापन झाले, याची माहिती शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडूनही जाणून घेतली. आढाव्यादरम्यान स्तर-५ वरील विद्यार्थ्यांकडून २० पर्यंतच्या संख्यांचे वाचन करून घेण्यात आले. त्यानंतर बिनहातच्याची बेरीज फळ्यावर करून घेत विद्यार्थ्यांच्या गणितीय कौशल्याची चाचणी घेण्यात आली. तसेच प्रगत स्तरातील एका विद्यार्थिनीला १०० पर्यंतच्या दोन अंकी संख्यांची हातच्याची बेरीज करण्यास सांगितले असता तिने अचूक उत्तर दिल्याने करिश्मा नायर यांनी तिचे विशेष कौतुक केले.
यानंतर एका विद्यार्थिनीचे वाचन ऐकून आवश्यक सुधारणा करण्याबाबत वर्गशिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. तर प्रगत गटातील विद्यार्थिनीने जोडाक्षरयुक्त शब्द आणि वाक्यांचे अचूक व प्रभावी वाचन करून दाखविल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तिचे अभिनंदन करत इतर विद्यार्थ्यांनीही तिचा आदर्श घ्यावा, असे सांगितले.व्हिडिओ संवादाच्या शेवटी करिश्मा नायर यांनी विद्यार्थ्यांची अध्ययन प्रगती, शिक्षकांचे नियोजन आणि निपुण भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी याबाबत समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांची गुणवत्ता अधिक वृद्धिंगत करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू ठेवावेत, अशा सूचनाही त्यांनी शिक्षकांना दिल्या.