7 हजाराची लाच : जिल्हा परिषदेच्या चाळीसगाव बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यासह स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ACB च्या जाळ्यात..

चाळीसगाव – जिल्हा परिषद बांधकाम विभागातील लाचखोरीच्या प्रकरणावर धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत उपविभागीय अभियंता आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहायक यांना ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात यथार्थ पांडुरंग निनावे (वय ४५), उपविभागीय अभियंता (वर्ग-१), जिल्हा परिषद बांधकाम विभाग, चाळीसगाव आणि कुलदिप विरुचंद गमे (वय ३०), स्थापत्य अभियांत्रिकी सहायक (वर्ग-३) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदारांच्या मित्राने मौजे दहिवद येथे ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोग योजनेअंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण व गावहाळाचे काम घेतले होते. हे काम तक्रारदारांनी मुदतीत पूर्ण केले. कामाचे मोजमाप, मूल्यांकन आणि मोजमाप पुस्तिका पूर्ण झाल्यानंतर सुमारे १० लाख ४७ हजार ८४३ रुपयांचे बिल मंजुरीसाठी उपविभागीय अभियंता यांच्याकडे पाठविण्यात आले होते.तक्रारदारांनी ३ जुलै २०२६ रोजी यथार्थ निनावे यांची भेट घेतली असता, बिल मंजूर करून देण्यासाठी एक टक्के प्रमाणे १० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला. याबाबत तक्रारदारांनी ७ जुलै रोजी धुळे ACB कडे तक्रार दाखल केली.
पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता, निनावे यांनी १० हजार रुपयांच्या मागणीवरून तडजोड करून ७ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.यानंतर ACB ने सापळा रचला. कारवाईदरम्यान उपविभागीय अभियंता यथार्थ निनावे यांनी त्यांच्या कक्षात तक्रारदाराकडून कुलदिप गमे यांच्या हस्ते ७ हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्याचवेळी ACB च्या पथकाने दोघांना पंचांसमक्ष रंगेहात पकडले.
ही कारवाई धुळे ACB चे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे तसेच पोहेकॉ. राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, पोकॉ. मकरंद पाटील, रामदास बारेला, प्रविण पाटील आणि जगदीश बडगुजर यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
या कारवाईमुळे सार्वजनिक बांधकामांच्या बिलांसाठी लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांवर ACB ने पुन्हा एकदा कठोर कारवाईचा इशारा दिला असून, शासकीय कामांसाठी कोणीही लाच मागितल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.