अमळनेरमध्ये हृदयद्रावक दुर्घटना : खदाणीच्या पाण्यात बुडून तिघ मुलांचा मृत्यू..

अमळनेर – शहरात मंगळवारी सायंकाळी घडलेल्या अत्यंत दुर्दैवी घटनेने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे. चोपडा रस्त्यावरील उड्डाणपुलाजवळ असलेल्या पाण्याने भरलेल्या खदाणीत बुडून तिघा अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मृत मुलांची नावे मानव बंटी रतनानी (वय १४), कार्तिक विकी उधवानी (वय १४) आणि दिनेश विजय पंजवानी (वय १७) अशी असून, तिघेही अमळनेर येथील सिंधी कॉलनी परिसरातील रहिवासी होते.
प्राथमिक माहितीनुसार, तिन्ही मुले मंगळवारी सायंकाळी खदाण परिसरात फिरण्यासाठी गेली होती. पाण्यातून चालत ते एका उंचवट्यावर पोहोचले. त्यावेळी सेल्फी काढत असताना एका मुलाचा पाय घसरल्याने तो खोल पाण्यात पडल्याची माहिती समोर येत आहे. त्याला वाचविण्यासाठी दुसऱ्या मुलाने मदतीचा प्रयत्न केला, तर दोघांना वाचविताना तिसराही खोल पाण्यात ओढला गेला. अवघ्या काही क्षणांत तिघेही सुमारे ३० फूट खोल पाण्यात बुडाले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, स्थानिक नागरिक आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. देवळी येथील दीपक मोरे यांनी धाडस दाखवत पाण्यात उतरून तिघांनाही बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.या हृदयद्रावक घटनेमुळे सिंधी कॉलनीसह संपूर्ण अमळनेर शहरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.