जळगाव

जळगावात ५६.२९ ग्रॅम MD जप्त : जळगाव पोलिसांची कारवाई..

जळगाव – शहरातील अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात स्थानिक गुन्हे शाखा आणि जिल्हापेठ पोलिसांनी संयुक्तपणे मध्यरात्री धडक कारवाई करत तब्बल ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त केले. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, एक आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाला आहे. पोलिसांनी ३ लाख ६ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या “नशामुक्त भारत” अभियानांतर्गत जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या विक्री व तस्करीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे १० जुलै रोजी पहाटे २.३५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यामागील शासकीय तांत्रिक विद्यालयाशेजारी असलेल्या जी.एस. ग्राऊंड परिसरात सापळा रचण्यात आला.

कारवाईदरम्यान मोटारसायकलवरून आलेल्या तीन संशयितांना अडविण्याचा प्रयत्न केला असता, एक जण घटनास्थळावरून पसार झाला. उर्वरित दोघांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून २ लाख ८१ हजार ५४० रुपये किमतीचे ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन आणि २५ हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर (MH-19 DJ-0132) मोटारसायकल जप्त करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे जयेश देविदास तायडे (२७, हरीओम नगर, जळगाव) आणि हितेंद्र शिवाजी परदेशी (३१, कांचन नगर, जळगाव) अशी आहेत. प्राथमिक चौकशीत दोघांनीही फरार आरोपी भैय्या सोनवणे (रा. कांचन नगर) याच्याकडून विक्रीसाठी मेफेड्रोन घेतल्याची कबुली दिली असून, त्याचा शोध सुरू आहे.दरम्यान, अटक आरोपी जयेश तायडे याच्याविरुद्ध यापूर्वी खुनाचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा, गंभीर दुखापत आणि दरोडा अशा स्वरूपाचे चार गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात NDPS कायदा १९८५ अंतर्गत कलम ८(क), २२(क) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या परिसरात अंमली पदार्थांची विक्री, साठवणूक किंवा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखा व जिल्हापेठ पोलीस पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे